Thursday, June 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजवैतरणा धरण व दुगारवाडीत चार युवकांचा बुडून मृत्यू; दोघांचे प्राण वाचवण्यात यश

वैतरणा धरण व दुगारवाडीत चार युवकांचा बुडून मृत्यू; दोघांचे प्राण वाचवण्यात यश

=

- Advertisement -

घोटी | जाकीर शेख Ghoti

इगतपुरी तालुक्यात रविवारी (दि. १२) सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास वैतरणा धरण व दुगारवाडी वावी धबधबा परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडण्याच्या घटना घडल्या. या दुर्दैवी घटनांमध्ये एकूण चार युवकांचा मृत्यू झाला असून दोन जणांना घोटी पोलिसांनी सुखरूप वाचवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत वैतरणा धरणालगत असलेल्या झारवड परिसरात बेटावर दोन जण बुडाले आहेत.तर दुसऱ्या घटनेत दुगारवाडी वावी धबधब्या जवळ दोन मित्र पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्याने एक जण वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही युवक पाण्यात गेला. या दुर्दैवी घटनेत दोघे युवक बुडाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले होते.

यातील पहिल्या घटनेतील मृत्यू झालेल्या युवकांची नावे आदित्य प्रमोद वानरे (वय २०, रा. नांदुरा, बुलढाणा) आणि विरेंद्र नंदन पाटील (रा. पाचोरा, जळगाव) अशी असल्याचे समजते. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तसेच दुसरी घटना वैतरणा धरणाच्या पाठीमागील दुगारवाडी वावी धबधब्यावर घडली. येथेही दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील मृत युवकांची नावे सुनील गोसावी (वय २९, रा. गंगापूर, नाशिक) आणि मंगेश दिलीप चव्हाण (रा. चांदशी, नाशिक) अशी असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव व शोध मोहीम राबवण्यात आली. स्थानिकांच्या मदतीने दोन जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. रात्री अंधार पडल्यामुळे शोधकार्य काही काळ थांबवण्यात आले असून पुढील शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक व गोताखोरांची मदत घेतली जाणार आहे.

मागील वर्षीदेखील याच ठिकाणी अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. त्यामुळे या परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने धरण व धबधबा परिसरात आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत धरणे, धबधबे व जलाशय परिसरात अंघोळीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : साईबाबा संस्थान; सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभागाबाबत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेली बातमी पूर्णपणे खोटी, तथ्यहीन व दिशाभूल...