Sunday, July 26, 2026
HomeनगरAhilyanagar : फसवणूक करणार्‍या कंपन्यांवर वेळीच कारवाई करा!

Ahilyanagar : फसवणूक करणार्‍या कंपन्यांवर वेळीच कारवाई करा!

महानिरीक्षक कराळे यांचे गुन्हे आढावा बैठकीत निर्देश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नाशिक परिक्षेत्रात आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचे सर्वाधिक प्रमाण हे दुर्दैवाने अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. नागरिकांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या कंपन्या पोलिसांच्या तावडीत येण्याआधीच पसार होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या कंपन्यांचा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

गुरूवारी (31 जुलै) येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात कराळे यांनी गुन्हे आढावा बैठक (क्राईम मिटींग) घेतली. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीत आगामी सण-उत्सव, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा, तसेच आर्थिक व सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण या विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) सोमनाथ वाकचौरे, सर्व उपविभागीय अधिकारी व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. कराळे यांनी शेवगाव शेअर मार्केट, शिर्डी, राहाता येथील ग्रो मोअर, तसेच अहिल्यानगर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील इन्फिनिटी, सिस्पे यांसारख्या फसवणूक प्रकरणांच्या दाखल गुन्ह्यांच्या तपासाची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून घेतली.

चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांची फसवणूक केली जात आहे. अनेक वेळा ही फसवणूक लक्षात येईपर्यंत संबंधित कंपनीचे संचालक पसार होतात. त्यामुळे पोलिसांनी आपल्या हद्दीत अशा कोणत्या संस्था कार्यरत आहेत, त्यांच्याकडून नागरिकांना कशा प्रकारे आमिष दाखवले जात आहे, याची वेळीच चौकशी करून आवश्यक असल्यास त्यांच्या विरोधात सुमोटो गुन्हा दाखल करावा, असे स्पष्ट निर्देश कराळे यांनी दिले.

सायबर क्राईमचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढत असून, नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि तपास प्रक्रियेला गती देण्यावरही भर देण्याचे आदेश त्यांनी दिले. गणेशोत्सव, दहीहंडी यांसारख्या सणांचे नियोजन तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले.

आर्थिक फसवणूक आणि सायबर क्राईममध्ये लक्षणीय वाढ झाली असून, अशा गुन्ह्यांकडे विशेष लक्ष देण्याचे व फसवणूक करणार्‍या कंपन्यांचा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. आगामी सण-उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा तातडीने करण्याचे आदेश दिले आहे.
– दत्तात्रय कराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र.

ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खरमरीत...

0
नवी दिल्ली | New Delhi दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षेचा (Neet Exam) पेपर फुटीच्या कारणावरून आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर...