अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा प्रशासन व पोलिसांनी डीजे बंदी जाहीर केली असताना ती धुडकावून लावली गेली व नेहमीप्रमाणे शुक्रवारी (25 सप्टेंबर) गणेश विसर्जन मिरवणुकीत शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती वगळता अन्य मानाच्या गणपतींपैकी सात मंडळांनी व शहर शिवसेना मंडळाने डीजेचा दणदटणाट केला. लेझर शो कोठे नव्हता, पण प्रखर दिव्यांच्या प्रकाशात तरुणाईचा चित्रविचित्र नृत्याविष्कार मात्र रंगला होता. दुसरीकडे नगरकरांनी पारंपरिक पद्धतीने परिवारासह धार्मिक विधी करीत गणरायाला निरोप दिला. सावेडीतील स्वतंत्र विसर्जन मिरवणुकीतही डीजेचा दणदणाट होता.
राज्यात यंदा सर्वत्र डीजे बंदीचा आवाज गाजला होता. पुण्यातील विद्यानंद बापट यांनी डीजेमुळे होणारा त्रास सांगितल्यावर त्यांना मारहाण झाली व त्यानंतर त्याचा निषेध केला गेला व राज्यभर डीजे बंदीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलिसांनीही डीजे बंदीचे आदेश जारी केले. गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी काहींनी डीजे वाजवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तो बंद पाडला. या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजणार की नाही, याची उत्सुकता होती. मात्र, प्रशासनाची बंदी झुगारून मंडळांनी डीजेचा दणदणाट केलाच.
दोन दिवसांपूर्वी भिंगारमधील विसर्जन मिरवणुकीत झालेला लाठीमार, त्यात एकाच्या मृत्यूचा केला गेलेला दावा, दोन चौकात झालेला रस्ता रोको व त्यामुळे एकूणच निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अहिल्यानगर शहरातील विसर्जन मिरवणुकीत फारसा हस्तक्षेप केला नाही. वाजणारे डीजे बंद केले नाहीत. त्यामुळे मंडळांचे पदाधिकारी व समर्थक कार्यकर्त्यांनी मनसोक्त नृत्योत्सव साजरा केला. चित्रपटांतील गीते व लावण्यांवर सारेच थिरकत होते.
शहराचे ग्रामदैवत विशाल गणेश मंडळाची उत्थापन पूजा शुक्रवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते झाली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्यासह अशोक कानडे, प्रा. माणिक विधाते व अन्य विश्वस्त उपस्थित होते. त्यानंतर मानाचा पहिला गणपती असलेला विशाल गणेश रामचंद्र खुंटावर आला व तेथून मिरवणूक सुरू झाली.
युगंधर व रुद्रनाथ ढोल पथकांचे सादरीकरण, विद्यार्थ्यांचा लेझीम डान्स मिरवणुकीत होता. मिरवणूक मार्गावर चौका-चौकात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विशाल गणेशाचे चौका-चौकात पुष्पवृष्टीने स्वागत होत होते. विशाल गणेश दिल्लीगेट वेशीबाहेर पडला तेव्हा मानाचा दुसरा गणपती संगम मंडळाचा नवी पेठेत-नेता सुभाष चौक परिसरात होता. त्यांच्यासमोर ढोल-ताशे होते. त्यानंतर महालक्ष्मी नावाच्या मंडळासमोर डीजे होता. त्यानंतरच्या दोस्ती ट्रस्ट, कपिलेश्वर, नवरत्न, समझोता, नील कमल, महालक्ष्मी (दुसरे), शिवशंकर व शहर शिवसेना या सर्व मंडळांचे डीजे होते.
पोलिसांकडून डीजे जप्त
कोतवाली पोलिसांनी माळीवाडा तरुण मंडळ, दोस्ती तरुण मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, दोस्ती मित्र मंडळ, अहिल्यादेवी होळकर विचार मंच तपोवन रोड, तपोवन रोडचा राजा, यशोदानगर मित्र मंडळ, शिवसेना शहर शिंदे गट या मंडळांचे डीजे जप्त करण्यात आले असून, पुढील प्रक्रिया सुरू आहे.
गणेशाच्या आशीर्वादाने प्रत्येकाला सुख, शांती व समाधान लाभावे, अशी प्रार्थना आ. संग्राम जगताप यांनी श्री विशाल गणेशाच्या चरणी करत शहराची चांगल्या विकासात्मक दिशेने वाटचाल होण्यासाठी आशीर्वाद द्यावा.नगर शहर विकासाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात सर्वोच्च उंचीवर जाण्यासाठी सर्वांचे योगदान लाभावे, अशी अपेक्षा आ. जगताप यांनी व्यक्त केली. गणेश विसर्जन निमित्ताने आ.संग्राम जगताप यांनी ग्रामदैवत श्री विशाला गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेशाचे मनोभावे दर्शन घेत आरती केली. तसेच गणपतीच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी गणेशाच्या चरणी प्रार्थना करत मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिराचे म्हणत संगमनाथ महाराजांनी आ.जगताप यांना श्री विशाल गणेशाचा प्रसाद देऊन आशीर्वाद दिला. त्यानंतर आ.जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक, श्री विशाल गणपती मंदिराचे विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.




