अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील एलपीजी गॅस गोदामांची विशेष पथकांमार्फत तपासणी करण्याची तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणार्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. त्यासाठी 14 तालुक्यासह नगर शहरात तपासणीसाठी 16 पथके तैनात करण्यात आली आहेत.
या पथकात तसीलदार, संबंधीत तालुक्याचे पोलिस निरिक्षक, उपप्रदेश अधिकारी यांच्यासह गॅस कंपनीच्या सप्लाय अधिकारी- कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी एलपीजी गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, सहायक पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी, तसेच गॅस कंपन्यांचे अधिकारी व गॅस वितरक उपस्थित होते.
घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहील याबाबत प्राधान्याने दक्षता घ्यावी, सध्या जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, ग्राहकांनी गॅस सिलेंडरसाठी मकेवायसीफ पूर्ण करून घ्यावी, नियमानुसार गॅस वितरण होत असल्याची खात्री करून घ्यावी, तसेच गॅसची ऑनलाईन नोंदणी करून अधिकृत पुरवठा दाराकाकडूनच गॅस उपलब्ध करून घ्यावा, गॅस वितरणासंदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास भारत पेट्रोलियम कार्पोरेशन (1800224333), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (180082333555), हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (18002333555) या टोल फ्री क्रमांकावर अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या (1077) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. गॅस एजन्सींनी गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेत व नियमानुसार करावा. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखावी तसेच ग्राहकांना वेळेत सेवा मिळेल यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वितरण करावे. प्रशासनाने गॅस पुरवठा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे अशा सूचनाही जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने तातडीने गॅस ग्राहकांची ईकेवासी पूर्ण करून घ्यावी. जेणे करून गॅस टाक्यांचा काळाबाजार होणार नाही. तसेच गॅस टाक्याचे वितरण हे ऑनलाईन बुकिंगनूसार करण्यात यावेत, अशा सुचना देत प्रत्येक तालुक्यात गॅसचा साठा व वितरण यांची तपासणी करण्यासाठी 16 पथके तैनात करण्याचे आदेश त्यांनी दिले.
तुटवडा नाही
जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅसच्या गोदामांची, एजन्सीची तपासणी करण्यासाठी, काळाबाजार रोखण्यासाठी तालुकानिहाय तसेच नगर अहिल्यानगर शहर व ग्रामीणसाठी दोन अशी एकूण 16 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पुरवठा निरीक्षकांच्या या पथकात पोलिस अधिकार्यांचाही समावेश असेल. जिल्ह्यात एकूण 13 लाख 60 हजार 772 गॅस जोडणी धारक आहेत, तर गॅस वितरकांची संख्या 109 व एकूण पेट्रोल पंपांची संख्या 493 आहे. सर्व वितरकांकडे तीन ते चार दिवसांचा साठा शिल्लक असतो व साठा संपू लागतो तशी नवीन आवक सुरू असते, त्यामुळे जिल्ह्यात तुटवडा नाही, असे जिल्हाधिकारी आशिया यांनी यावेळी सांगितले.
रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली
जेव्हा मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला त्याच्या पहिल्या दिवसापासूनच केंद्र सरकारकडून इंधनाच्या सोर्सवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं, अशी माहिती अधिकार्यांकडून देण्यात आली आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमती वाढतच आहेत. दरम्यान भारतानं इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे.
युध्दामुळे तीन महिन्यांचे धान्य एकदम मिळणार !
रेशन दुकानात गहू, तांदूळ आणि मका होणार उपलब्ध
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जगात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुढील तीन महिन्यांचे धान्य उचल करून लाभार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशन दुकानात गहू, तांदूळ आणि मका मिळणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य पुरवठा केला जातो. अंत्योदय योजनेचे 87 हजार कार्डधारक असून, 3 लाख 86 हजार लाभार्थी आहेत.
तर, प्राधान्य कुटुंब योजनेत 6 लाख 37 हजार रेशनकार्डधारक असून, 25 लाख 63 हजार लाभार्थी आहेत. अंत्योदय योजनेत प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 35 किलो धान्य दिले जाते. सध्या 10 किलो मका व 10 किलो गहू तर 15 किलो तांदूळ दिला जातो. तर, प्राधान्य कुटुंब योजनेत प्रत्येक व्यक्तीला दरमहा 5 किलो धान्य मिळते, यात 2 किलो गहू, 1 किलो मका आणि 2 किलो तांदूळ दिला जात आहे. आता तीन महिन्यांचे एकत्रित धान्य लाभार्थ्यांना मिळणार आहे.
दिवसभर दुकान खुले राहणार
पुरवठा विभागाकडून तालुकास्तरावरील गोदामात धान्याचे वितरण झाल्यानंतर तत्काळ रेशन दुकानदारांना धान्य वितरण करायचे आहे. रेशन दुकानदारांना दररोज दुकान खुले ठेवून लाभार्थ्यांना वेळेत तीन महिन्यांचे धान्य वितरण करायचे आहे.
पर्यायी व्यवस्था करावी लागणार
पुढील महिन्यापासून हे धान्य लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुकास्तरावरील शासकीय गोदामात पुरेशा प्रमाणात धान्य उतरून घेण्यासाठी जागा आवश्यक आहे. जागा उपलब्ध नसल्यास पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.




