Tuesday, September 29, 2026
HomeनगरCrime News : गॅस रिफिलिंगचा काळाबाजार उघड

Crime News : गॅस रिफिलिंगचा काळाबाजार उघड

21.80 लाखांचा मुद्देमाल जप्त || दोघे ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून कमर्शियल सिलिंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून त्याची विक्री करणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. तपोवन रोड परिसरातील दक्षतानगर येथे केलेल्या कारवाईत भारत गॅस व एचपी गॅस कंपनीच्या 133 घरगुती व कमर्शियल गॅस टाक्यांसह तब्बल 21 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, व्यवसायाचा मालक आणि गॅस टाक्या पुरविणारा अन्य एक जण पसार आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, प्रताप देवकाते, मनोज साखरे, अमोल कोतकर यांचे पथक तयार केले होते. हे पथक 18 सप्टेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना दक्षतानगर, तपोवन रोड परिसरात गॅस रिफिलिंगचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी दोन इसम घरगुती गॅस टाकीला इलेक्ट्रिक मोटार जोडून ती वजनकाट्यावर ठेवून गॅस रिफिलिंग करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे गॅस टाक्यांचा वापर आणि रिफिलिंग व्यवसायासाठी आवश्यक परवान्याबाबत विचारणा केली.

मात्र, त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कल्ला रघुराज सिंग (वय 24, रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, बोल्हेगाव) आणि गौरव राजेंद्र आढाव (वय 34, रा. आढाववाडी, पिंपळगाव माळवी) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी व्यवसायाच्या मालकीबाबत चौकशी केली असता, हा व्यवसाय किरण संतोष गलांडे (रा. दक्षतानगर, तपोवन रोड) याच्या मालकीचा असल्याचे ताब्यातील आरोपींनी सांगितले. तसेच रिफिलिंगसाठी वापरण्यात येणार्‍या घरगुती गॅस टाक्या नितीन कदम (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही, रा. पाइपलाइन रोड) याच्याकडून खरेदी केल्याची माहिती त्यांनी दिली. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू असून ते पसार आहेत. या सर्वांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंविरोधात बोलल्याने धमक्या, महिलेकडून पोलिसांत तक्रार; थेट…

0
जालना । Jalna मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला सातत्याने घेरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणींत दिवसागणिक वाढ होत असल्याचे चित्र आहे. अंतरवाली सराटीतील २० दिवसांच्या...