अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
केडगाव बायपास रस्त्यावरील अनुराज टायर गोडाऊनमध्ये टँकरमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या गॅस रिफीलिंग करणार्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत 41 लाख 26 हजार 339 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून गोडाऊन मालक पसार झाला आहे. गॅससारख्या ज्वलनशील पदार्थाचा जीव धोक्यात घालून सुरू असलेला हा बेकायदेशीर उद्योग एलसीबीने धाडसी कारवाई करून उघडकीस आणताच परिसरात खळबळ उडाली आहे.
रविवारी (7 डिसेंबर) पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना बातमीदारामार्फत केडगाव बायपास रस्त्यालगतच्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये अवैध रिफीलिंग सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तातडीने सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये व अनंत सालगुडे, अंमलदार हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर यांना सोबत घेऊन संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली. पथकाने छापा टाकताच गॅस टँकरमधून मोठ्या पाइपांनी व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे कार्य प्रत्यक्ष सुरू असल्याचे आढळले.
पोलिसांनी कृष्णा मधुकर दहिफळे (वय 30, रा. लातूर), अदित्य सुनील पवार (वय 21, रा. बुलढाणा, सध्या रा. केडगाव), विश्वास त्रिंबक शिंदे (वय 51, रा. केडगाव), जनातुल शेख (वय 19, रा. वेस्ट बंगाल, सध्या रा. केडगाव) यांना ताब्यात घेतले. तर या अवैध धंद्याचा मुख्य मालक राजू साबळे (रा. केडगाव) हा पसार असल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी 17 टन एच.पी. गॅस, टँकर, गॅसच्या 20 रिकाम्या टाक्या, पाच भरलेल्या टाक्या, दोन लाख रूपयांचा टेम्पो, लोखंडी पाना, वजनकाटा, पाच पाइपांचे नॉझल असा एकुण 41 लाख 26 हजार 339 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धोकादायक पध्दतीने रिफीलिंग
चाकण (पुणे) येथून टँकर मध्ये गॅस भरून तो छत्रपती संभाजीनगर येथे खाली केला जातो. मात्र टँकर चालक आर्थिक फायद्यासाठी सदरचा टँकर केडगाव शिवारातील अनुराज टायर गोडाऊनमध्ये घेऊन जात होता. तेथे संशयित आरोपी अतिशय धोकादायक पध्दतीने व्यावसायिक टाक्यांमध्ये हा गॅस रिफीलिंग करत असल्याचे समोर आले आहे. एका टेम्पोमध्ये व्यावसायिक टाक्या ठेवल्या जातात व काही मिनिटांमध्ये त्यामध्ये टँकरमधून गॅस रिफीलिंग केला जात असल्याचे तपासातून समोर आले आहे.
मोठा अपघात टळला
गॅस टँकरमधून थेट व्यवसायिक टाक्यांमध्ये कोणताही परवाना, सुरक्षाव्यवस्था किंवा अग्रिम उपाययोजना नसताना जुगाड पध्दतीने रिफीलिंग केले जात होते, याची पक्की खबर एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याची योजना आखली. आपल्या अधिकारी, अंमलदारांना सोबत घेत त्यांनी स्वत: घटनास्थळ गाठले व कारवाई केली. कबाडी यांच्या धाडसी कारवाईमुळे मोठा अपघात टळला आहे. दरम्यान ही प्रक्रिया अतिशय धोकादायक असून क्षणात स्फोट होऊन जीवितहानी होण्याचा मोठा धोका असल्याचे निरीक्षक कबाडी यांनी सांगितले.





