Sunday, March 22, 2026
HomeनगरRahata : सामान्यांच्या चुली विझल्या अन् हॉटेल मालकांचे खिसे गरम!

Rahata : सामान्यांच्या चुली विझल्या अन् हॉटेल मालकांचे खिसे गरम!

पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने जनतेच्या हक्कावर ‘दरोडा’

राहाता |प्रतिनिधी| Rahata

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचा आणि जागतिक इंधन टंचाईचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घराला बसू लागला आहे. मात्र अशा भीषण संकटाच्या काळातही राहाता तालुक्यात ‘इंडेन’ गॅस एजन्सीकडून माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला असून घरगुती वापराचे सिलेंडर चक्क खासगी कार्यक्रम आणि व्यावसायिक संस्थांना चढ्या दराने पुरवले जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एकीकडे सामान्य ग्राहक सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभा असताना दुसरीकडे एजन्सीच्या मेहेरबानीने शेकडो सिलेंडर हॉटेल आणि लग्न सोहळ्यात जळत आहेत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना पहाटेपासून एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विस्कळीत झाल्याचे तुणतुणे वाजवून सर्वसामान्य ग्राहकांना रिकाम्या हाती परत पाठवले जात आहे. मात्र हेच चित्र तालुक्यात फिरल्यावर पूर्णपणे वेगळे दिसते. तालुक्यातील अनेक हॉटेल्स, चहा टपर्‍या आणि रेस्टॉरंट्समध्ये घरगुती वापराच्या टाक्यांचा अवैध वापर राजरोसपणे सुरू आहे. नियमानुसार व्यावसायिक वापरासाठी महागडे सिलेंडर वापरणे बंधनकारक असताना, गरिबांच्या हक्काचे सबसिडीचे स्वस्त सिलेंडर या धनदांडग्या व्यावसायिकांकडे पोहोचतातच कसे? हा सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राहाता तालुक्यातील काही खासगी कार्यक्रमांसाठी आणि लग्न सोहळ्यांसाठी घरगुती गॅस टाक्यांची मोठी रसद पुरवली जात आहे. सामान्य ग्राहकाला एक सिलेंडर मिळवण्यासाठी वणवण करावी लागत असताना एजन्सीच्या ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे हे सिलेंडर काळ्या बाजारात वळवले जात आहेत. हे केवळ बेकायदेशीरच नाही तर टंचाईच्या काळात जनतेच्या अन्नावर डल्ला मारण्याचा संतापजनक प्रकार आहे.

या सर्व प्रकारात तालुका पुरवठा विभागाची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि संतापजनक आहे. सामान्य जनतेला हक्काचा गॅस मिळवण्यासाठी रेशनिंगप्रमाणे रांगेत उभे राहावे लागत असताना दुसरीकडे दोन हजार रुपये घेऊन काळ्या बाजारात घरगुती सिलेंडर्सची खिरापत वाटली जात आहे. डोळ्यादेखत हॉटेल्स आणि मंगल कार्यालयात घरगुती सिलेंडरचा वापर होत असताना, पुरवठा विभाग निद्रावस्थेत का आहे? की या काळ्या बाजारात पुरवठा विभागाचेही हात ओले झाले आहेत? असे प्रश्न आता जनतेतून विचारले जात आहेत.

गॅसची नळी बदलण्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट करायची आणि हक्काचा गॅस व्यापार्‍यांना विकायचा, असा दुहेरी छळ इंडेन गॅस एजन्सीकडून सुरू आहे. पुरवठा विभागाने तातडीने या ठिकाणांची तपासणी करून सिलेंडर जप्त करावेत आणि संबंधित एजन्सीचा परवाना रद्द करावा, अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आता नागरिक देत आहेत.

दैनिक सार्वमतने तालुक्यात ठिकठिकाणी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. तालुक्यातील नामांकित हॉटेल्स, चहा टपर्‍या, नाष्टा सेंटर्स आणि मोठ्या खासगी कार्यक्रमांच्या ठिकाणी घरगुती वापराच्या निळ्या ऐवजी लाल टाक्यांचा वापर राजरोसपणे सुरू आहे. व्यावसायिक वापरासाठी महागडे सिलेंडर वापरणे कायद्याने बंधनकारक असताना एजन्सीच्या संगनमताने सबसिडीचे स्वस्त सिलेंडर या व्यावसायिकांच्या चुलीत जळत असल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Crime News : बड्या धेंडांची भागीदारी; खरातच्या ‘मायाजाला’त प्रशासकीय...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वयंघोषिक कॅप्टन खरात (Ashok Kharat) याच्या नावे असलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे एकामागून एक धक्कादायक पदर आता उलगडू लागले आहेत. केवळ जमीन...