Saturday, April 4, 2026
HomeनगरAhilyanagar : गॅस टाक्या वितरणासाठी पोलीस संरक्षण द्या

Ahilyanagar : गॅस टाक्या वितरणासाठी पोलीस संरक्षण द्या

जिल्हाधिकार्‍यांनी बोलवली बैठक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

घरगुती गॅस टाक्यांच्या वितरणातील अडचणींच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस वितरकांनी एकत्रितपणे जिल्हाधिकार्‍यांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी आहिल्यानगर शहराच्या पाईपलाईन रस्ता भागात गॅस टाकी वितरण करणारा टेम्पो टोळक्याकडून अडवण्याचा प्रकार घडला. यासंदर्भात तोफखाना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज शुक्रवारी जिल्ह्यातील गॅस पुरवठा कंपन्यांचे प्रतिनिधी, गॅस वितरक यांची बैठक बोलावली आहे. जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑइल या कंपन्यांचे एकूण 109 वितरक आहेत. त्यांच्याकडे एकूण ग्राहकांची संख्या 13 लाख 60 हजार 773 आहे. सर्वाधिक ग्राहक संख्या भारत पेट्रोलियम कंपनीकडील आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस वितरणासाठी गॅस कंपन्यांकडून नियमाची अंमलबजावणी सुरुवात करण्यात आली आहे. हे नियम पूर्वीही होते, मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आता ती होऊ लागल्याने अफवांचे पीक पसरले आहे. गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅस टाक्यांचे वितरण थांबवले आहे. घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यातील गॅस वितरकांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण इंगळे यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे गॅस वितरणासाठी पोलीस संरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिल्याचे सांगितले. गॅस वितरकांनी वैयक्तिक निवेदनही दिलेली आहेत. अशी निवेदने प्राप्त झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी सांगितले.

शहरातील युनिटेक गॅस एजन्सीचा गॅस टाक्या वितरणासाठी चाललेला टेम्पो टोळक्याने अडवण्याचा प्रकार आज सकाळी घडला. या संदर्भात तोफखाना पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती एजन्सीच्या संचालक विजया फटांगरे यांनी सांगितले. टेम्पो अडवणारे ग्राहक नव्हते तर टोळके होते, पाईपलाईन रस्ता भागातील एकविरा चौकाजवळ ही घटना घडली. एजन्सीच्या वडगाव येथील गोदामातून निघालेला टेम्पो टोळक्याने अरेरावी व शिवीगाळ करत अडवला व गॅस टाक्यांची मागणी केली. पोलिसांना दूरध्वनी केल्यानंतर टोळके पसार झाले. याशिवाय गॅस टाकी वितरणातील विस्कळीतपणामुळे गॅस एजन्सीचे कर्मचारी व ग्राहकांमध्ये वादावादीच्या घटनाही घडू लागल्या आहेत.

गॅस वितरण सुरळीत असून अफवांमुळे आगाऊ नोंदणीमध्ये वाढ झाली आहे, साठा करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. व्यावसायिक टाक्या बंद झाल्यामुळे व्यवसाय करणारे घरगुती टाक्यांचा वापर करू लागले आहेत. त्यातून अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्राहकांनी मकेवायसीफची पूर्तता करावी यासाठी गेल्या वर्षभरापासून जनजागृती केली जात होती. आता वितरण्यासाठी केवायसी बंधनकारक केल्याने अनेकांना त्याची अडचण भासत आहे. त्यातून अफवा निर्माण होत आहेत. ग्राहकांशी वाद होण्याच्या घटना घडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गॅस वितरकांनी पोलीस संरक्षणाची मागणी केल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार – महसूल मंत्री...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच होण्यासाठी शासन प्राधान्याने प्रयत्न करत...