Wednesday, September 2, 2026
Homeक्रीडाआता Gen-Z क्रिकेटर्स उतरले रस्त्यावर! स्टेडियमच्या बाहेर 250 खेळाडूंचं आंदोलन, कारण काय?

आता Gen-Z क्रिकेटर्स उतरले रस्त्यावर! स्टेडियमच्या बाहेर 250 खेळाडूंचं आंदोलन, कारण काय?

लखनौ । Lucknow

- Advertisement -

आत्तापर्यंत आपण ‘जनरेशन झी’ (Gen Z) या नव्या पिढीला शिक्षण, रोजगार किंवा सामाजिक मुद्द्यांवर आंदोलनाचा एल्गार पुकारताना पाहिले आहे. मात्र, आता याच तरुण पिढीची क्रिकेटच्या मैदानावरील हक्कांची लढाई थेट रस्त्यावर आली आहे. उत्तर प्रदेशातील २५० हून अधिक नवोदित ‘Gen Z’ क्रिकेटपटूंनी त्यांच्या पालकांसह लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमबाहेर जोरदार आंदोलन छेडले आहे. उत्तर प्रदेशसारख्या विशाल राज्यात केवळ एक नव्हे, तर तब्बल तीन रणजी संघ स्थापन करावेत, ही त्यांची मुख्य मागणी आहे.

उत्तर प्रदेश क्रिकेट प्लेयर्स असोसिएशन आणि पूर्वांचल क्रिकेट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पूर्वांचल आणि मध्य उत्तर प्रदेशातील तरुण खेळाडूंवर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. क्रिकेट प्लेयर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अरविंद सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास २५ कोटींच्या घरात आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी फक्त एक रणजी संघ असणे म्हणजे हजारो गुणवान खेळाडूंच्या स्वप्नांवर पाणी फेरणे आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यापूर्वी राज्यातील खेळाडूंना पुरेशा संधी मिळण्यासाठी अधिक रणजी संघांची शिफारस केली होती.”

सध्या सुरू असलेल्या उत्तर प्रदेश टी-२० लीगचे उदाहरण देत अरविंद सिंग यांनी भेदभावाचे आकडे समोर ठेवले. लीगच्या चालू हंगामातील सहा संघांमधील १५० खेळाडूंपैकी केवळ १६ खेळाडू पूर्वांचल आणि मध्य उत्तर प्रदेशातील आहेत. याउलट, ८९ खेळाडू हे पश्चिम उत्तर प्रदेशातील अवघ्या ९ जिल्ह्यांतील आहेत आणि चक्क ८ खेळाडू दिल्लीतील आहेत. यामुळे स्थानिक गुणवान खेळाडूंवर मोठा अन्याय होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

आंदोलक खेळाडूंनी रणजी ट्रॉफीच्या विद्यमान रचनेचा दाखला दिला. महाराष्ट्रात विदर्भ, मुंबई आणि महाराष्ट्र असे ३ स्वतंत्र संघ खेळतात. तसेच गुजरात राज्यात गुजरात, बडोदा आणि सौराष्ट्र हे ३ रणजी संघ आहेत. जर तिथे खेळाडूंना अधिक संधी मिळू शकतात, तर २५ कोटी लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशात ३ रणजी संघटना किंवा संघ का असू नयेत? असा रोखठोक सवाल या ‘Gen Z’ खेळाडूंनी उपस्थित केला आहे. या अनोख्या आंदोलनामुळे उत्तर प्रदेशातील क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ घेणार राहुल गांधींची भेट; मंत्री...

0
नाशिक | Nashik गेल्या १५ दिवसांपासून शहरातील ईदगाह मैदानावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन (Protest) सुरू आहे. दहा ते बारा दिवसांपासून तीन विद्यार्थी (Student)...