Friday, July 19, 2024
Homeनगरभौगोलिकदृष्ट्या श्रीरामपूरच जिल्ह्याचे मुख्यालय योग्य

भौगोलिकदृष्ट्या श्रीरामपूरच जिल्ह्याचे मुख्यालय योग्य

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठ्या असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर श्रीरामपूरच ‘जिल्हा मुख्यालय’ होण्यासाठी भौगोलिक परिस्थिती देखील अनुकूल आहे. उत्तर नगरमध्ये श्रीरामपूर हे मध्यवर्ती ठिकाण असून शहराच्या चारही बाजूने शेती महामंडळाची जागा मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर व अहिल्यानर-मनमाड हे दोन्ही महामार्ग श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयाच्या शेजारून गेलेले आहेत. ही सर्व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याने श्रीरामपूरच जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण व्हावे, ही श्रीरामपूर तालुक्याबरोबरच शेजारच्या तालुक्यातील जनसामान्यांची इच्छा आहे.

माजी उपनगराध्यक्ष शिवसेना नेते संजय छल्लारे यांनी श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, ही येथील प्रत्येक नागरिकांची तसेच राजकारण्यांची गेली 45 वर्षांपासूनची इच्छा आहे. गेली 45 वर्षे हा विषय असाच रखडलेला आहे. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी अनेकांनी प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु अद्यापही यश आले नाही. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी भौगोलिक परिस्थिती देखील अनुकूल आहे. सध्या स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, या मागणीसाठी विविध प्रकारची आंदोलने हाती घेण्यात आली आहेत. काल त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्ह्यासाठी मागणी केली. त्यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील सर्वपक्षिय नेतेमंडळी उपस्थित होती. त्यामुळे यापुढेही श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी होणार्‍या प्रत्येक आंदोलनामध्ये शहर व ग्रामीण भागातील सर्वपक्षिय नेते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन छल्लारे यांनी केले.

स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष व रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सर्व सोयीयुक्त श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय करून शासनाने येथील सर्वसामान्यांची इच्छा पूर्ण करावी ,अशी मागणी केली. कारण उत्तर नगरचा विचार केला तर श्रीरामपूर हेच मध्यवर्ती ठिकाण आहे. सर्व शासकीय कार्यालयांच्या सुसज्ज अशा इमारती याठिकाणी उपलब्ध आहेत. शेतीमहामंडळाची शेकडो एकर जमीन शहराच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे जिल्हा मुख्यालय होण्यासाठी शासनाला जास्त खर्च करण्याची गरज निर्माण होणार नाही. त्यामुळे शासनाने सर्व परिस्थितीचा विचार करून श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय घोषित करावे, अन्यथा यापुढे स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्यावतीने अनेक आंदोलने हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकूणच प्रस्तावित अहिल्यानगरचे विभाजन झाल्यानंतर श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, या जनसामान्यांच्या मागणीचा विचार करून विधानसभा लागण्याआगोदर महायुती सरकारने श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय घोषित करावे, अशी मागणी आता श्रीरामपूर तालुक्याबरोबर इतरही तालुक्यांतील नागरिक करत आहेत. त्याचा राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने विचार करावा, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या