Friday, October 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजएकदरे–नार–पार नदीजोड प्रकल्पाला चालना द्या - श्रीराम शेटे

एकदरे–नार–पार नदीजोड प्रकल्पाला चालना द्या – श्रीराम शेटे

ओझे l विलास ढाकणे
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एकदरे–वाघाड–करंजवण–ओझरखेड–तिसगाव धरणजोड कालवा, दुष्काळी गावांसाठी उचलपाणी परवानग्या आणि नार–पार नदीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रकल्पांना गती द्यावी, अशी मागणी कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली. वाघाड धरणावरील जलपूजन व वार्षिक पाणी नियोजन कार्यक्रमात त्यांनी या मागण्या मांडत तीन स्वतंत्र निवेदने सादर केली.

- Advertisement -

वाघाड–करंजवण–ओझरखेड–तिसगाव धरणजोड कालव्याची मागणी
एकदरे व अन्य वळण योजनांमधून वाघाड धरणात येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा उपयोग करून ते करंजवण, ओझरखेड व तिसगाव धरणांत कालव्याद्वारे वळविण्याची योजना राबवावी. यामुळे मनमाड, चांदवड, दिंडोरी, वणी, येवला व पिंपळगाव, एच.ए.एल. परिसरातील पाणीपुरवठा आणि सिंचनाचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. यासाठी तांत्रिक सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करावा, अशी मागणी शेटे यांनी केली.

दुष्काळी गावांना उचलपाणी परवानग्या द्या
एकदरे धरणातून वाघाडमध्ये उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजांना प्राधान्य द्यावे. जाबुंटके, नाळेगाव, रासेगाव, इंदोरे, मडकीजांब, तळेगाव दिंडोरी, शिवनई, खतवड, ढकांबे, जानोरी व वरवंडी आदी दिंडोरी तालुक्यातील दुष्काळी गावांना उचलपाणी परवानग्या देऊन उपसा सिंचन योजना राबवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

नार–पारचे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा
अरबी समुद्राला वाहून जाणारे पार नदीचे अतिरिक्त पाणी वळण योजना व उपसा सिंचनाद्वारे मांजरपाडा योजनेशी जोडून करंजवण आणि पुणेगाव धरणांत आणण्याच्या पर्यायाचे सर्वेक्षण करावे. पुढे पिंगळवाडी परिसरातून अहिवंतवाडी, भातोडा, धोडप किल्ला, हट्टी, चांदवड, नांदगाव व येवला तालुक्यांकडे पाणी पोहोचविण्यासाठी हायलेव्हल कॅनाल चा अभ्यास करावा. तसेच पार व अंबिका – औरंगा खोऱ्यांतील उपलब्ध अतिरिक्त पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविणाऱ्या एकात्मिक नदीजोड प्रकल्पाला गती द्यावी. या योजनांमध्ये दिंडोरी पेठ व सुरगाणा तालुक्यांतील स्थानिक शेतकऱ्यांच्या पाणी गरजांनाही प्राधान्य द्यावे, असे शेटे यांनी निवेदनात नमूद केले.

दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी धरणांसाठी जमिनी देऊन मोठा त्याग केला आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

श्रीराम शेटे यांनी मांडलेल्या सूचनांचे स्वागत करून संबंधित मागण्यांचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

ताज्या बातम्या

AMC : फ्लेक्समुक्त नगरसाठी मनपाचा पुढाकार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहराचे विद्रुपीकरण रोखून अहिल्यानगरला फ्लेक्समुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक आणि अन्य ठिकाणी लावण्यात येणार्‍या सर्व...