नाशिक, दि. 19 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) :
राज्यात पर्जन्याधारित शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनुदान तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक शेततळे योजनेमुळे शेतकऱ्यांच उत्पादनात व उत्पन्नात वाढ होवून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. सन २०२६-२७ या वर्षात एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संरक्षित सिंचनाचा स्रोत असलेल्या शेततळे घटकासाठी प्रतीक्षा यादीतील 87 हजार 174 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या संचालक डॉ. मेघना केळकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
महा-डीबीटी पोर्टलवरील प्रतीक्षा यादीतून एकूण 87 हजार 174 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील 3 हजार 925, अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५ हजार ३७९, तर इतर प्रवर्गातील 77 हजार 870 याप्रमाणे प्रवर्गनिहाय शेतकऱ्यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे, जसे की हमीपत्र (परिशिष्ट २), आवश्यकतेनुसार जातीचा दाखला अथवा दिव्यांग प्रमाणपत्र महा-डीबीटी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. याबाबत नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात आले आहे. लघुसंदेश प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत. कागदपत्रे स्पष्ट व अद्ययावत असणे आवश्यक असून, विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड रद्द होणार आहे. पुढील प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाहीबाबत शेतकऱ्यांना नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेश तसेच महा-डीबीटी पोर्टलद्वारे सूचना देण्यात येणार आहेत.
निवड झाल्यानंतर पूर्वसंमती मिळाल्यावर सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून शेततळ्याचे काम विहित वेळेत पूर्ण करणारे शेतकरी अनुदानास पात्र राहतील. योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी अथवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.




