Wednesday, February 19, 2025
Homeनगरगोदावरी कालव्यांना रब्बी एक व उन्हाळ्यासाठी 2 आवर्तने

गोदावरी कालव्यांना रब्बी एक व उन्हाळ्यासाठी 2 आवर्तने

चार्‍यांच्या कामांसाठी 260 कोटींच्या प्रस्तावाला तातडीने मान्यतेसाठी प्रयत्न

राहाता |प्रतिनिधी| Rahata

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोर्‍यात अतिरिक्त पाणी निर्माण करण्यास माझे सर्वोच्च प्राधान्य असून गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीच 190 कोटी रुपये महायुती सरकारने मंजूर केले आहेत. आता चार्‍यांच्या कामांसाठी 260 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अगामी काळात लाभक्षेत्रासाठी रब्बी हंगामात एक व उन्हाळ्यासाठी दोन आवर्तनांचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

गोदावरी डाव्या आणि उजव्या कालवा सल्लागार समितीची बैठक ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी खा. भाऊसाहेब वाकचौरे, आ. आशुतोष काळे, आ. हेमंत ओगले, माजी आ. स्नेहलता कोल्हे, प्रांताधिकारी माणिक आहेर, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधिक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, दोन्हीही कालव्यांवरील शेतकर्‍यांना आजपर्यंत संघर्षाला सामोरे जावे लागले. हा संघर्ष कमी करण्यासाठी आता चांगली संधी मिळाली आहे. गोदावरी तुटीच्या खोर्‍यात नवीन पाणी निर्माण करुन या भागाचा दुष्काळ संपविण्याला आपला प्राधान्यक्रम आहे. कालव्यांची वहनक्षमता वाढविणे हेही आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आता सद्य परिस्थितीत कालव्यांची वहन क्षमता वाढविण्यासाठी हे ब्रिटीशकालीन कालवे दुरुस्तीची मोठी गरज असून यासाठी महायुती सरकारने 190 कोटी रुपये मंजूर केले आहेत. चार्‍यांच्या कामांसाठीही आता निधी मिळावा म्हणून प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, 260 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळेल असेही ना.विखे पाटील म्हणाले.
गोदावरीच्या लाभक्षेत्रात बिगर सिंचनाचे आरक्षण 52 टक्के झाले आहे. त्यामुळेच या भागात अतिरिक्त पाणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

लाभक्षेत्रासाठी पुढील काळात तीन आवर्तनांचे नियोजन विभागाने केले असून 170 दिवसांच्या कालावधीमध्ये 90 दिवस कालव्यांमधून पाणी उपलब्ध होईल असे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता विभागाच्या आधिका-यांसह शेतक-यांनीही घ्यावे असे त्यांनी सुचित केले. शिर्डी नगरपालिकेच्या वाया जाणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी 11, 12, 13 चारीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना बारमाही पाणी मिळण्याचे नियोजन असून. पिंपळवाडी चारी क्र. 14 साठी स्वतंत्र पाईपलाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आ. आशुतोष काळे म्हणाले, आपल्याकडे पाणी आहे पण नियोजन करण्यासाठी कर्मचारी वर्ग अपुरा आहे. त्यामुळे लाभधारक शेतकर्‍यांना वेळेवर पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. त्यासाठी जलसंपदा विभागात नवीन कर्मचार्‍यांची तातडीने भरती करावी. पाटबंधारे विभागाकडून आवर्तनाबाबत प्रकटन प्रसिद्ध करण्यात येवून लाभधारक शेतकर्‍यांना पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी आवाहन केले जाते.

त्यावेळेस लाभधारक शेतकर्‍यांना जास्तीत जास्त पाणी मागणी अर्ज भरावे यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही देखील शेतकर्‍यांना आग्रह करतो. परंतु दिवसेंदिवस पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने सातत्याने पाणी पट्टीत केलेली वाढ. उन्हाळ्याची पाणीपट्टी तर पाच हजार पर्यंत गेली असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर चालू वर्षी सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन देण्यास सहमती दिली आहे. मात्र पाण्याची जास्तीत जास्त बचत करून तीन आवर्तनाचे चार आवर्तन करा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली. यावेळी खा. भाऊसाहेब वाकचौरे, विवेक कोल्हे यांनीही सुचना केल्या. जलसंपदा विभागाने केलेल्या आवर्तनाच्या नियोजनाची माहिती अभियंता गोवर्धने यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या