Saturday, August 1, 2026
Homeनगरगोदावरीत ४९३८२ क्युसेकने विसर्ग; पावसाचा जोर, जायकवाडीत उपयुक्त साठा ७५ टक्क्यांवर

गोदावरीत ४९३८२ क्युसेकने विसर्ग; पावसाचा जोर, जायकवाडीत उपयुक्त साठा ७५ टक्क्यांवर

राहाता (तालुका प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्यात काल धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार आगमन होत होते. त्यातच पाण्याची पातळी राखण्यासाठी धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आले. धरणातील विसर्ग काहीसे वाढविण्यात आल्याने नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल सायंकाळी ६ वाजता ४९३८२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता.

- Advertisement -

काल ३१ जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र पाऊस मध्यम स्वरूपाचा झाला. घोटी, इगतपुरी भागात पावसात जोर होता. धरणाच्या भिंतीजवळ २३.५ मिमी, भामच्या भिंतीजवळ ५६ मिमी, भावलीला ५६ मिमी पाऊस काल असा दिवसभरात नोंदला गेला. ७१४९ क्षमतेच्या दारणा धरणात ५९६५ दलघफू पाणीसाठा आहे. दारणा धरणात ८३.४४ टक्के पाणीसाठा आहे. काल सकाळी संपलेल्या मागील २४ तासांत या धरणात २६१ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. या धरणातून ५२६४ क्यूसेकने विसर्ग केला जात आहे. दारणा धरणातून आता पर्यंत ७ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दारणा समूहातील भावलीतून १.१ टीएमसी, भाममधून १.८ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. काल सायंकाळी भाममधून १७२२ क्यूसेक, भावलीतुन ७०१ क्युसेकने विसर्ग दारणा धरणाच्या दिशेने येत आहे. भावली, भाम हे १०० टक्के भरले आहेत. या धरणांच्या पाणलोटात घाटमाथ्यावर धबधबे कोसळत असल्याने नवीन पाणी दाखल होत आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोटातही काल दिवसभरात पावसाचे आगमन मध्यम स्वरूपाचे झाले. हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने रात्रीतून पावसाचे आगमन होऊ शकते. गंगापूरच्या भिंतीजवळ २९ मिमी पाऊस काल दिवसभर नोंदला गेला. या धरणातून ३०९९ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. ५६३० क्षमतेच्या गंगापूर मध्ये ४५४४ दलघफू पाणीसाठा स्थिर ठेवून विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर ८०.७१ टक्के भरले आहे. तीन तासात धरणात ३१ दलघफू नवीन पाणी दाखल झाले. गंगापूर समूहातील कश्यपी धरणातून १००० क्युसेक, गौतमी गोदावरी धरणातून १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कश्यपी ९१.७४ टक्के तर गौतमी गोदावरीमध्ये ९०. ३८ टक्के पाणीसाठा आहे.

कडवा धरणातून ३८३२ क्युसेक, पालखेड मधून २०८८८ क्यूसेक, ओझरखेड मधून २५५२ क्युसेक, वाघाड मधून २८०६ क्युसेक, तिसगाव २०० क्युसेक, पुणेगाव २६१५ क्युसेक, वालदेवी ८१४ क्युसेक, भोजापूर १९९ क्युसेक, आळंदी ६८७क्युसेक, करंजवन १५४४० क्युसेक असे विसर्ग सुरू आहेत.
खाली नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या मुक्त पाणलोटातील पावसाचे पाणी, धरणातील विसर्ग दाखल होत असल्याने गोदावरीत काल सायंकाळी जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत ४९३८२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. काल सकाळी ६ पर्यंत १ जून पासून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत ३४.७ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

नाशिकला रेड अर्लट

दरम्यान, नाशिकला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. हा अंदाज खरा ठरल्यास पुन्हा एकदा गोदावरी नदीस पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी नाशिक, उपविभागीय दंडाधिकारी कळवण आणि तहसीलदार कळवण यांच्या सूचनेनुसार सप्तशृंगगड ते नांदुरी घाट रस्ता आज ३१ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आणि भाविकांच्या प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे.

६२२३१ क्युसेक पाणी जायकवाडीच्या दिशेने

पाण्याची आवक सुरूच आहे. काल सायंकाळी ६ वाजता या जलाशयात १४ हजार क्युसेकने आवक सुरू होती. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून ४९३८२ क्युसेक, निळवंडेतून १२८४९ क्युसेकने विसर्ग सुरू होता. जास्तीचा विसर्ग नदी मार्गात आहे. जायकवाडी पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. काल सायंकाळी ६ वाजता जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा ५७.३ टीएमसी इतका झाला होता. मृतसह एकूण साठा ८३.४ टीएमसी इतका झाला आहे.

कोतूळमधील मुळाचा विसर्ग ५६३८ क्युसेक; मुळातील साठा ७० टक्क्यांवर

कोतूळ (वार्ताहर) गत दोन दिवसांपासून पाणलोटात पाऊस काहीसा वाढल्याने मुळा नदीचा विसर्गही वाढला आहे. नवीन पाण्याची आवक हळुवार होत असली तरी २६००० दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात एकूण पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहचला आहे.

काल सकाळी मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग ४४२९ क्युसेक होता. तर साठा १८०२५ दलघफू (६९.३२टक्के) होता. दिवसभर हरिश्चंद्र गड, पाचनई आंबित व अन्य भागात पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसत असल्याने मुळा नदीतील विसर्ग सायंकाळी ५६३८ क्युसेकपर्यंत वाढला. तर पाणीसाठा १८१६१ दलघफू झाला होता. रात्री उशीरा हा साठा १८२०१ दलघफू झाला होता.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : दिवसा इलेक्ट्रीशियन, रात्री मारायचे डल्ला; ५ लाखांच्या...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati दिवसा ठिकठिकाणी इलेक्ट्रीशियन म्हणून काम करायचे आणि रात्रीच्या वेळी इमारतींमधून लाखो रुपयांची कन्सील कॉपर वायर लांबवायची, अशा भामट्यांच्या टोळीचा आडगाव...