पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
पुणतांबा येथील रेल्वे पुलापासून ते पुरणगाव येथील गोदावरी नदीवर बांधण्यात येत असलेल्या नियोजित पुलापर्यंतचे नदीपात्र पूर्णपणे कोरडेठाक पडले आहे. बेकायदा वाळू उपशामुळे ठिकठिकाणी नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये थोडेफार पाणी साचलेले आहे. नोव्हेंबर महिन्यातच गोदावरी नदीपात्र कोरडे झाल्याने सध्या बेकायदा वाळूचा उपसा जोरात सुरू आहे.
वाळूचे ट्रक, ट्रॅक्टर तसेच अन्य साधनांद्वारे वाहतूक करण्यासाठी नदीपात्रालगत चांगले रस्ते तयार करण्यात आले आहेत. पुणतांबा गावात बेकायदा वाळू उपशासह इतरही अवैध धंद्यांनी चांगलाच जम बसविला आहे. महसूल विभाग, पोलीस यंत्रणा आणि गावातील नेत्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गावात गुंडगिरी वाढली असून, अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत.
नदीपात्र कोरडे झाल्यामुळे लाख, बापतरा आणि पुरणगाव या नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना पुणतांब्याकडे ये-जा करणे सुलभ झाले आहे. दुचाकींबरोबरच चारचाकी वाहनांतूनही ग्रामस्थ नदीपात्रातून ये-जा करू लागले आहेत. दरम्यान, पुरणगाव येथे गोदावरी नदीवर बांधण्यात येणार्या नियोजित पुलाच्या कामानेही गती घेतली आहे. मात्र, नदीपात्र कोरडे झाल्यामुळे आगामी काळात नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे.




