राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
दारणा, गंगापूर, मुकणे धरणांच्या पाणलोटात दोन दिवसांपासून जोरदार बॅटींग सुरु असल्याने धरणातील विसर्ग वाढविण्यात आले आहेत. खाली नांदूर मधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने 22 हजार 345 क्युसेकने विसर्ग सुरु होता. पण रात्री 9 वाजता हा विसर्ग 31 हजार283 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर धुव्वाधार पाऊस बरसत आहे. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 166 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीला 110 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या भिंतीजवळ 49 मिमी पावसाची नोंद झाली. धरणात पाण्याची आवक वाढु लागल्याने दारणातून काल सकाळी अवघा 400 क्युसेकने विसर्ग सुरु होता. परंतु बुधवारी पाण्याची आवक आणि पावसाची पुन्हा धुव्वाधार बॅटिंगमुळे सह्याद्रीचा घाटमाथा इतगतपुरी, घोटी, भावली परिसर झोडपून काढला. बुधवारी सकाळी 6 ते सायंकाळी 6 अशा 12 तासात भावलीला 157 मिमी, भामला 135 मिमी तर दारणाच्या भिंतीजवळ 94 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दारणातून काल सायंकाळी 22 हजार 530 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. दारणा नदीतून हे पाणी गोदावरीवरील नांदूर मधमेश्वर बंधार्याच्या दिशेने वेगाने वाहत होते. भावलीतून 2324 क्युसेक, भाम मधून 6029 क्युसेकने विसर्ग सुरु आहेत. ही धरणे तुडूंब भरलेली आहेत.
गंगापूर धरणाच्या पाणलोटातही संततधार सुरु आहे. गंगापूर धरणातील विसर्ग अनेक दिवसांपासुन बंद होता. संततधार पावसाने गोदावरीला नाशिक शहरात उथळ पात्रामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काल सायंकाळी 6 वाजता गंगापूर धरणातून 6340 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. काल दिवसभर गंगापूरच्या पाणलोटात मुसळधार पाऊस पडत होता. काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 या 12 तासांत गंगापूरच्या भिंतीजवळ 72 मिमी, कश्यपीला 71 मिमी, गौतमी गोदावरीला 70 मिमी, त्र्यंबकला 85 मिमी, तर अंबोलीला 101 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर समुहातील तीनही धरणांमधून विसर्ग सोडण्यात येत आहे. काल सायंकाळी 6 वाजता कश्यपीतून 3888 क्युसेक, गौतमीतून 3450 क्युसेक तर गंगापूर मधून 6340 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता.
मंगळवारी दिवसभर व सांयंकाळी या धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग केले जात आहेत. गौतमी, कश्यपी 100 टक्के भरलेले आहेत. तर गगापूर 92.47 टक्क्यांवर आहे. गंगापूरमध्ये 12 तासांत जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवक झाली. दारणा, गंगापूर समुहा बरोबरच मुकणेतून 1655 क्युसेक, वालदेवीतून 814 क्युसेक, आळंदीतून 687 क्युसेक, कडवातून 1598 क्युसेक तर पालखेड मधुन 772 क्युसेकने विसर्ग सुरु आहेत. नाशिकच्या 15 धरणांमधून विसर्ग सुरु आहेत.
खाली नांदूरमधमेश्वर बंधार्यात वरील धरणांमधून विसर्ग वेगाने दाखल होत आहेत. काल सकाळी या बंधार्यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत अवघा 1211 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो सकाळी 9 वाजता 6310 क्युसेक इतका वाढविण्यात आला. दुपारी 12 वाजता तो 12620 क्युसेकवर नेण्यात आला. काल सायंकाळी 7 वाजता तो 22345 क्युसेक पर्यंत वाढविण्यात आला. रात्री 9 वाजता 31 हजारहून अधिक क्युसेक करण्यात आला होता. त्यामुळे गोदवरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान गोदावरीतुन जायकवाडीकडे 42.6 टिएमसी पाण्याचा विसर्ग यापुर्वी करण्यात आला आहे. आता आणखी पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहात आहे.





