कोल्हापूर | Kolhapur
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तासंघर्षात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान महायुतीच्या वकिलांच्या भूमिकेवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने काही मुद्द्यांवर महायुतीच्या वकिलांना सुनावले, तसेच पुढील प्रक्रियेबाबत इशाराही दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
सुनावणीत नेमकं काय घडलं?
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसह चार शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून समविचारी आघाडीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेदरम्यान घडलेल्या घटनांचा समावेश करण्यासाठी दुरुस्ती अर्ज करण्यात आला होता. मात्र, या अर्जाला महायुतीच्या वकिलांनी आक्षेप घेतला. समविचारी आघाडीच्या वतीने अध्यक्ष निवडीच्या सभेत घडलेल्या घडामोडी न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणण्याची मागणी करण्यात आली. यावर न्यायालयाने संबंधित सर्व घडामोडी अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील, असे स्पष्ट करत याचिकेत दुरुस्ती करण्यास परवानगी दिली.
पडसाद : नाईक संस्था कात टाकण्याच्या तयारीत..
नोटीस मिळाली नसल्याचा मुद्दा; न्यायालयाची नाराजी
सुनावणीदरम्यान काही संचालकांना नोटीस मिळाली नसल्याचा मुद्दा महायुतीच्या वकिलांकडून मांडण्यात आला. मात्र, यासंदर्भातील आक्षेप आणि सुनावणी पुढे नेण्याच्या प्रक्रियेवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. नोटीस प्रक्रियेमुळे सुनावणी रखडू नये, यासाठी सर्व संबंधित संचालकांना विविध माध्यमांतून नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले. महायुतीचे १२ संचालक आणि चार शासननियुक्त संचालक अशा एकूण १६ जणांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. नोटीस बजावूनही संबंधित संचालक उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांच्या अनुपस्थितीत सुनावणी पुढे सुरू ठेवली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
अध्यक्ष निवडीच्या सभेचे इतिवृत्त सादर करण्याचे आदेश
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी १० नोव्हेंबर रोजी झालेल्या निवड प्रक्रियेतील घडामोडीही या प्रकरणात महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्या सभेचे इतिवृत्त अर्थात प्रोसीडिंग न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत शासननियुक्त संचालकांचा सहभाग, त्यांच्या मतदानाचा अधिकार आणि त्याआधारे झालेली निवड या सर्व बाबी न्यायालयीन परीक्षणाच्या कक्षेत आहेत. त्यामुळे अध्यक्ष निवडीसंदर्भातील सर्व कागदपत्रे आणि संबंधित संचालकांची बाजू पुढील सुनावणीवेळी महत्त्वाची ठरणार आहे.
आता ३ डिसेंबरच्या सुनावणीकडे लक्ष
गोकुळ दूध संघातील शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा निर्णय, त्यांना देण्यात आलेला मतदानाचा अधिकार आणि अध्यक्ष निवडीची प्रक्रिया यावर न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. संबंधित संचालकांना नोटीस बजावून त्यांची बाजू ऐकण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत संबंधित संचालकांची भूमिका, याचिकेतील दुरुस्ती आणि अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेबाबत पुढील न्यायालयीन दिशा काय ठरते, याकडे कोल्हापूरच्या सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गोकुळमधील सत्तासंघर्षाला या सुनावणीमुळे आणखी निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे.




