अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मैत्रिणीच्या नात्याचा गैरफायदा घेत साड्या पाहण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे 14 तोळ्याचे दागिने व एक लाखाची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना शहरातील विद्यानगर, अरणगाव रोड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रीती बबन बोठे (वय 38, रा. विद्यानगर, अरणगाव रोड, अहिल्यानगर) यांनी रविवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी फिर्याद दिली. त्यानुसार स्नेहल ज्ञानदेव बेंदे (वय 25, मुळ रा. बाभळेश्वर, ता. राहता, हल्ली रा. बागरोजा हडको, अहिल्यानगर) हिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रीती बोठे यांच्या घरातील लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये दैनंदिन वापरातील सोन्याचे दागिने तसेच व्यवसाय व बचत गटाचे एक लाख रूपये रोख ठेवले होते. स्नेहल बेंदे ही फिर्यादीची मैत्रीण असून दोघी 2022 ते 2025 या कालावधीत न्यू लॉ कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत होत्या. त्यामुळे तिचे फिर्यादीच्या घरी नियमित येणे-जाणे होते. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, 29 जुलै रोजी दुपारी स्नेहलने मोबाईलवर मेसेज पाठवून तिला मुलगा पाहण्यासाठी येणार असल्याने साडी हवी असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास ती फिर्यादीच्या घरी आली. ज्या खोलीत कपाटात दागिने ठेवले होते, त्याच ठिकाणी साड्या असल्याने स्नेहल साडी परिधान करून पाहण्यासाठी त्या खोलीत गेली. त्यावेळी फिर्यादी दुसर्या खोलीत असल्याने स्नेहलने काही काळ एकटीच बेडरूममध्ये होती. त्यानंतर तिने दोन साड्या घेऊन घरातून निघून गेली.
दरम्यान, शनिवारी (1 ऑगस्ट) दुपारी बचत गटातील पैसे घेण्यासाठी एक महिला फिर्यादीच्या घरी आली असता फिर्यादी कपाटातून पैसे काढण्यासाठी गेल्या. मात्र, कपाटातील रोख रक्कम दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने तपासले असता तेही गायब असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संशय बळावून स्नेहल बेंदे हिनेच दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची कर्णफुले, पाच तोळ्यांचे मिनी गंठण, 2.5 तोळ्यांचे मिनी मंगळसूत्र, अर्धा तोळ्याचे कानातील दागिने, प्रत्येकी एक तोळ्याच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, अर्धा तोळ्याची सोन्याची नथ, दोन ग्रॅमचे सोन्याचे मणी, दोन ग्रॅमच्या सोन्याच्या फिरक्या आणि एक लाख रूपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.




