Saturday, October 3, 2026
HomeनगरCrime News : सोनारासह तिघे गजाआड; 12 गुन्ह्यांची उकल

Crime News : सोनारासह तिघे गजाआड; 12 गुन्ह्यांची उकल

पाथर्डी तालुक्यातील दरोड्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून छडा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पाथर्डी तालुक्यातील किर्तनवाडी येथे जून महिन्यात झालेल्या धाडसी दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणातील दोन चोरट्यांसह चोरीचे सोने घेणार्‍या सोनाराला अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीत जबरी चोरी व घरफोडीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.

- Advertisement -

10 जून रोजी पहाटे दीडच्या सुमारास किर्तनवाडी येथे सात जणांनी रावसाहेब बाजीराव किर्तने यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यांच्यासह पत्नीला मारहाण करून एक लाख 63 हजार रूपयांचा ऐवज जबरदस्तीने लंपास केला होता. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक माहिती, बातमीदार आणि व्यावसायिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू ठेवला.

दरम्यान, 7 जुलै रोजी माहितीच्या आधारे संशयित आरोपी टाकळी मानूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राम कृष्णा चव्हाण (वय 22, रा. चकलांबा, ता. गेवराई, जि. बीड) आणि करण रामनाथ भोसले (वय 20, रा. सारोळा कासार, ता. अहिल्यानगर) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांनी आपल्या इतर साथीदारांसह किर्तनवाडी येथील दरोडा केल्याची कबुली दिली. या टोळीत राहुल रज्जाक काळे, आदिशोक चंद्रभान चव्हाण, हनुमान कृष्णा चव्हाण, लक्ष्मण कृष्णा चव्हाण, सागर नाबद चव्हाण, कडुबा ढोणे आणि विकास भोसले यांचा समावेश असल्याचे समोर आले असून ते पसार आहेत.

तपासादरम्यान राम चव्हाण याने चोरीतील सोन्याचे दागिने ओमकार पांडुरंग दहीवाळ (रा. चकलांबा, जि. बीड) याला विकल्याची माहिती दिली. त्याबाबत चौकशी केली असता संबंधिताने समाधानकारक माहिती न दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्या विरोधात शेवगाव व पाथर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जबरी चोरी, घरफोडी व चोरीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, फुरकान शेख, भिमराज खर्से, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गुंजाळ, अमोल आजबे, मनोज साखरे, सागर ससाणे, प्रशांत राठोड, भगवान धुळे यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महिनाभरातच नववधूचे बिंग फुटले, चार मुलांची आई असल्याचे उघड

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत मुंबईतील एका एजंट महिलेने राहुरी तालुक्यातील तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवून त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. मोठ्या...