श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील मेनरोडवरील रामभाऊ सोपान नागरे हे सराफाचे दुकान फोडून (Goldsmith Shop Theft) लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला होता, याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) जालना (Jalna) येथून जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे 14 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दि.17 जुलै रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी मेनरोडवरील रामभाऊ सोपान नागरे या ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील ड्रॉवर व कपाटामधील सोन्याचे व चांदीचे दागिने (Gold and Silver Jewelry), लगड असा एकूण 26 लाख 59 हजार 745 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील ना उघड घरफोडींच्या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, यांनी तपास पथकातील पोसई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रमीजराजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांड यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनाठिकाणी भेट देऊन, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. नमुद गुन्हा हा गोपीसिंग टाक, शिवाजी प्रल्हादराव सासनिक (रा.जालना) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. दि.22 जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हे जालना येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने जालना तालुका पोलीस स्टेशन, येथे जाऊन येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय साळुबा मेहत्रे यांच्या मदतीने संशयीत आरोपीचा शोध घेऊन गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक (वय 25), दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक (वय 28, मुळ रा. गुरूगोविंदसिंगनगर, शिकलकरी मोहल्ला, टाक हाऊस, जालना), शिवाजी प्रल्हादराव सासनिक (वय 36, रा.रेणुकामाता मंदिराजवळ, गांधीनगर, जालना), अमित नंदलाल दागडिया (वय-32, रा.खरपुडी रोड, हरीगोविंदनगर, जालना) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सदर दुकानामध्ये चोरी केल्याचे सांगितले. पथकाने आरोपीकडून 14 लाख 07 हजार रूपये किंमतीचा त्यात होंडा कंपनीची सीटीझेड एक्स कार (क्र.एमएच-03-एझेड-5458), पाच मोबाईल, 11 किलो 230 ग्रॅम चांदीचे दागिने व लगड, 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. ताब्यातील आरोपी दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक याच्यावर जालना जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दरोडा तयारी, घरफोडी व चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत.
आरोपींना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन (Shrirampur Police Station) येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, यांच्या सूचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे.




