सांगली | Sangli
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अखेर विजयाचा गुलाल उधळला आहे. जत सोसायटी गटातील अत्यंत चर्चेत असलेल्या लढतीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांचा २० मतांनी पराभव केला. पडळकर यांना ५४ मते मिळाली, तर विनोद पवार यांना ३४ मते मिळाली. या विजयामुळे पडळकर यांनी सांगली जिल्हा बँकेत प्रथमच प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी त्यांच्या उमेदवारीवरून न्यायालयीन लढाई रंगली होती. तसेच जयंत पाटील यांच्याशी असलेल्या राजकीय संघर्षामुळे ही निवडणूक अधिक चर्चेत आली होती. विजयाची घोषणा होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष केला.
५४ मते मिळवत पडळकरांचा दणदणीत विजय
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जत सोसायटी गटातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि महाविकास आघाडीचे विनोद पवार यांच्यात थेट लढत झाली. या गटात एकूण ८८ मतदार होते. विजयासाठी ४५ मतांचा कोटा आवश्यक होता. मतमोजणीत पडळकर यांनी ५४ मते मिळवत विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण केला. विनोद पवार यांना ३४ मते मिळाली. अशा प्रकारे पडळकर यांनी २० मतांच्या फरकाने विजय मिळवला. या निकालाने जत तालुक्यासह सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
उमेदवारी अर्जावरून थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई
या निवडणुकीत पडळकर यांची उमेदवारी सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली होती. छाननी प्रक्रियेदरम्यान त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांची उमेदवारी कायम राहिली आणि निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयीन लढाईनंतर प्रत्यक्ष मतदानातही विजय मिळवल्याने पडळकर समर्थकांसाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण ठरला.
मुरासू चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकलं; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पावसाचा इशारा
जतच्या लोकांनी इतिहास मोडीत काढला
जतच्या लोकांनी आधीचा इतिहास मोडीत काढला अन् नवीन इतिहास रचला आहे. देवाभाऊ आणि चंद्रकांतदादा आणि इतर नेत्यांनी माझ्यामागे पाठबळ निर्माण केलं. आम्ही ताकदीने लोकांच्या बाजूने उभं राहणार आहे. संस्था मोडीत काढायच्या आणि कवडीमोलानं विकत घ्यायच्या हेच आत्तापर्यंत चालत होतं. पण आता सभासदांच्या हिताचाच निर्णय जिल्हा बँकेमध्ये होतील, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यानंतर त्यांनी जयंत पाटलांना निशाण्यावर घेतलं.
आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो
करेक्ट कार्यक्रम करणाऱ्याचे आम्ही कार्यक्रम करतो. टप्प्यात आल्यावर कुणीही कार्यक्रम करतो. आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय. मतदानाच्या दिवशी त्यांना मिरजेमधून परत जावा लागले. जतला आणि कवठेमहांकाळला येण्याचे त्यांचे धाडस झाले नाही. लोकं जेव्हा ताकदीने पाठीला उभे राहतात, तेव्हा त्यांची ताकद होत नाही. लोकांच्या हिताचं काम आता आम्ही जिल्हा बँकेत करणार आहे, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांचा विजय घोषित झाल्यावर समर्थकांची जल्लोषाची जय्यत तयारी केली होती. मिरज मिशन चौकात जेसीबीने गुलाल उधळण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. डॉल्बीचा दणदणाट, क्रेनच्या सहाय्याने भव्य हार घालण्याची तयारी करण्यात आली आहे. तसेच पडखळकरांचे बॅनर चौकाचौकात लावण्यात आले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणीच पडळकर समर्थकांकडून विजय साजरा केला गेला.




