मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी विधान भवनाच्या लॉबीत तुंबळ हाणामारी झाली. आमदार आणि मंत्री ज्या प्रवेशद्वारातून विधान भवनात प्रवेश करतात त्याच द्वारासमोर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारलं, याचे व्हिडिओ समोर आले अन् महाराष्ट्राची मान शरमेनं झुकली. पोलिसांनी पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत अटक केली. आव्हाड यांनी पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केले, यावर आमदार पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
आम्ही कोर्टात लढायला तयार आहोत, आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते असल्याचे ते म्हणाले. आमच्या सहकाऱ्याकडून चूक झाल्याचेही पडळकर म्हणाले. या प्रकरणी काल मी माझी भूमिका व्यक्त केली होती. मी कालच विधानसभा अध्यक्षांना भेटून दिलगिरी व्यक्त केली.
या घटनेवर काल मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे. विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली. आमच्या कार्यकर्त्यांकडून चूक झाली, त्यांना ताकिद दिली आहे. तुम्ही जी काही कारवाई करायची ती करू शकता, असे अध्यक्षांसोबत बोलणे झाले होते. अध्यक्षांच्या अधिकारातील हा विषय आहे. त्यामुळे ते कारवाई करतील ती मान्य असेल. रात्री उशिरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभा अध्यक्षांनी जी भूमिका घेतली, त्यावर कोणतेही मत नाही. जी कारवाई झाली, त्याला कोर्टात सामोरे जायला तयार आहे, असे पडळकर म्हणाले. पोलिसांच्या गाडीसमोर झोपणे किंवा अडवणे, मोडतोड करणे ही गुंडगिरी नाही का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.
दरम्यान, गुरवारी राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ दाखवला होता. या व्हिडीओत पडळकर हे कार्यकर्त्यांसोबत विधिमंडळाच्या पायऱ्याजवळ चर्चा करत होते. त्याच दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीश देशमुख हे जाताना दिसले. त्याच वेळी पडळकर यांनी त्याच्याकडे पाहून पडळकर यांनी काही भाष्य केल्याचे दिसले. त्यानंतर देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला.
या व्हिडीओबाबत विचारले असता, गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, तो नितीन देशमुख माझा कार्यकर्ता नाही. त्याला मी ओळखत नाही. तो व्हिडीओ सगळा पाहा, मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत होतो. लक्षवेधीवर चर्चा नव्हती म्हणून बाहेर आले होतो. त्याच वेळी ही घटना घडली असल्याचे पडळकर यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





