Thursday, October 1, 2026
Homeक्राईमShrirampur : गोरख जेधे टोळीवर 111 प्रमाणे वाढीव कलम

Shrirampur : गोरख जेधे टोळीवर 111 प्रमाणे वाढीव कलम

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भंगार घेण्याच्या बहाण्याने एका तरुणावर गोळीबार व प्राणघातक हल्ला करणार्‍या गोरख जेधे टोळीवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 111 अंतर्गत संघटित गुन्हेगारीची कडक कारवाई केली आहे. आरोपींचे गंभीर गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता त्यांना जामीन मिळू नये आणि संघटित गुन्हेगारीचा बीमोड व्हावा, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरातील इंदिरानगर परिसरात एका युवकावर चॉपर, चाकूने वार करून पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोक्काच्या धर्तीवर भारतीय न्याय संहितेचे संघटित गुन्हेगारीचे कलम 111 हे वाढीव कलम लावून मोठी कारवाई केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामधील टोळीप्रमुख गोरख उर्फ विजय जेधे (वय 33) आणि त्याचे साथीदार मनोज साबळे (वय 23), जयप्रकाश उर्फ सोन्या बेग (वय 41), अंकुश जेधे (वय 34) व दोन विधिसंघर्षित बालकांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर श्रीरामपूर व इतर पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अपहरण, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्याने, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मंजुरीने हे वाढीव कलम जोडण्यात आले. या नवीन कायद्यातील कडक कलमामुळे आरोपींना सहज जामीन मिळणे कठीण होणार असून, संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे व पो. स. ई. निकम यांनी ही धडक कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या