Saturday, April 4, 2026
HomeनगरAhilyanagar : 38 हजार 737 नोकरदारांनी घेतले सरकारचे ‘मोफत धान्य’

Ahilyanagar : 38 हजार 737 नोकरदारांनी घेतले सरकारचे ‘मोफत धान्य’

दुबार आधार नोंद || 79 हजार 442 लाभार्थ्यांची नावे वगळली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मिशन सुधार योजनेअंतर्गत राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागाला 5 लाख 98 हजार 237 लाभार्थ्यांची यादी पडताळणीसाठी दिली होती. पहिल्या टप्प्यात झालेल्या पडताळणीत जिल्ह्यात 38 हजार 737 सरकारी नोकरदार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले असून त्यांचा लाभ बंद करुन केशरी किंवा पांढरे रेशनकार्ड देण्यात आले आहे. तर दुबार आधार नोंद असलेले 79 हजार 442 लाभार्थ्यांची नावे कमी करण्यात आली आहेत.

- Advertisement -

रेशनधान्य दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंबातील लाभार्थींना दरमहा मोफत धान्य दिले मिळते. मात्र, यातील अनेक शिधापत्रिकाधारक हे शासकीय कर्मचारी आहेत. तसेच काही शिधापत्रिकधारकांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे यांनी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत रास्त भाव दुकानातील धान्य घेतलेले नाही. गेल्या काही वर्षांपासून बोटाचे ठसे घेऊन धान्य वितरित केले जात असल्याने कोणत्या ग्राहकाने किती काळ धान्य घेतलेले नाही, हे लक्षात येते. तसेच ग्राहकांचे आधारकार्ड जोडल्याने त्यांची सर्व माहिती शासनाकडे उपलब्ध झाली आहे. यातून राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील धान्य न घेणार्‍या किंवा शासकीय सेवेत असणार्‍या रेशन ग्राहकांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला पाठविली आहे. या यादीचा आढावा घेण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागाकडून सुरु आहे.

साडेचार लाख शेतकर्‍यांची पडताळणी
शासनाने पुरवठा विभागाला आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले 4 लाख 58 हजार 329 लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पुरवठा विभागाकडून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यीची पडताळणी केली जात आहे. पात्र असताना एकाही शेतकर्‍यांचा धान्याचा बंद होऊ नये, यासाठी पुरवठा विभागाकडून काळजीपूर्वक पडताळणी केली जात आहे.

8 हजार लाभार्थी कुटुंबातून स्थालांतरित
कुटुंबातील स्थालांतरित झालेल्या व्यक्ती 8 हजार 367 आढळून आल्या आहेत. त्यांच्याकडून लाभ सुरु ठेवण्याबाबत अर्ज भरुन घेतले जाणार आहेत. अन्यथा लाभ बंद केला जाणार आहे. शंभरपेक्षा अधिक वय असलेल्या 1 हजार 869 लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 189 चिमुकले कुटुंबात एकल लाभार्थी आढळून आले आहेत.

5 हजार ‘सधन’ लाभार्थी
जिल्ह्यात आर्थिक स्थिती चांगली असलेले 5 हजार 621 लाभार्थी आढळून आले आहेत. चारचाकी वाहन नावावर असलेले धान्याचा लाभ घेणारे 862 लाभार्थी आहेत. आर्थिक उत्पन्न देणार्‍या अस्थापनेचे मालक असताना आई-वडिलांच्या रेशनकार्डमध्ये नाव असलेले 262 लाभार्थी आहेत. तसेच आधारकार्डबाबत अडचणी असलेल्या 5 हजार 381 लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ०४ एप्रिल २०२६ – बंगालमधील झुंडशाही

0
पश्चिम बंगालमधील कालीचक येथे घडलेली घटना लोकशाही व न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारी आहे. तीन महिलांचा समावेश असलेल्या सात न्यायालयीन अधिकार्‍यांना तब्बल नऊ तास संतप्त...