Thursday, September 3, 2026
HomeनगरAhilyanagar : चौपट कर आकारणीमुळे ग्रामपंचायती होणार मालामाल!

Ahilyanagar : चौपट कर आकारणीमुळे ग्रामपंचायती होणार मालामाल!

दहा वर्षांनंतर सुधारीत कर आकारणी || उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ यांच्या प्रयत्नांना यश

ज्ञानेश दुधाडे | अहिल्यानगर | Ahilyanagar

- Advertisement -

2015-16 नंतर प्रथमच अहिल्यानगर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी रूपाली दहिफळे यांच्या सातत्यामुळे जिल्ह्यात यंदापासून सुधारित पद्धतीने ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टी आकारणी करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यातील जुनी थकबाकी व 2026-27 ची सुधारित कराची रक्कम ही 80 कोटींवरून थेट 357 कोटी 47 लाख रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात तब्बल चार पटीने वाढ होणार आहे.

ग्रामपंचायतींकडून दरवर्षी पाणी पट्टी, घरपट्टी, दिवाबत्तीच्या रूपाने करवसुली केली जाते. परंतु अनेकदा हा कर भरण्यास ग्रामस्थ पुढे येत नाहीत. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढते. 31 मार्च 2024-25 अखेर घरपट्टी व पाणीपट्टी मिळून 92 कोटी 11 लाखांची, तर 2025-26 अखेर 149 कोटी 32 लाख अशी 215 कोटी 99 लाख रुपयांची थकबाकी होती. शिवाय 2026-27 ची चालू मागणी 142 कोटी 27 लाख आहे. यामुळे एकट्या नगर जिल्ह्यात 14 तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे जुनी थकबाकी पुर्नविलोकन व चालूवर्षी पाणीपट्टी, घरपट्टी व किरकोळ मागणीची अशी एकूण 357 कोटी 47 लाख रुपये वसुलीची रक्कम झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची कर सुधारणा होण्यापूर्वी अवघी 80 कोटी 10 लाख होती. त्यात आता चौपट वाढ झाली असून यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

जिल्ह्यात 1 हजार 324 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणार्‍या घर, दुकान, व्यावसायिक गाळे अन्य जागांच्या करांमध्ये, पाणीपट्टीमध्ये 2015-16 पासून वाढ झालेली नव्हती. दर पाच वर्षांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणी आणि घरपट्टीच्या रचनेत वाढ करणे अपेक्षित आहे. मात्र, नगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून या विषयात कोणीच लक्ष घातलेले नव्हते. मात्र, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली वर्षभर या विषयावर काम केले.

तसेच दर महिन्यांला ग्रामपंचायतींच्या सुधारीत कर प्रणाली विषयाचा पाठपुरावा करत हा विषय तडीस नेला. या कामी नगरला हा विषय पाहणार्‍या रुपाली दहिफळे यांनी विषयात सातत्य ठेवत तो तडीस नेला. यामुळे जिल्ह्यातील चालू वर्षीच्या सुधारीत कर रचनेत ग्रामपंचातींची पाणीपट्टी व घरपट्टी तसचे किरकोळ कर मागणीची रक्कम 2024 च्या 80 कोटी 10 लाखांच्या तुलनेत आता 357 कोटींवर पोहचली आहे. म्हणजे दोन वर्षांपूर्वीचा कर आता चौपटीने वाढणार असून त्यामुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

भंडारींना शंका व गुंजाळ यांची तपासणी
जिल्हा परिषदेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या जिल्हास्तरावरील थकबाकीचा अभ्यास केल्यानंतर यात तफावत असल्याची शंका मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांना आली. याबाबत त्यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांना ग्रामपंचायतींच्या कराची फेर तपासणी करण्याचे आदेश दिले. या फेरतपासणीत 100 कोटींच्या आत असणारे कर वसुलीचे उद्दिष्ट 357 कोटी 47 पर्यंत वाढले.

थकबाकी व सुधारीत कर
अकोले 15 कोटी 29 लाख, संगमनेर 39 कोटी 84 लाख, कोपरगाव 15 कोटी 74 लाख, राहाता 25 कोटी 48 लाख, श्रीरामपूर 17 कोटी 53 लाख, राहुरी 28 कोटी 41 लाख, नेवासा 31 कोटी 74 लाख, नेवासा 15 कोटी 93 लाख, शेवगाव 15 कोटी 29 लाख, पाथर्डी 11 कोटी 92 लाख, जामखेड 29 कोटी 58 लाख, कर्जत 19 कोटी 58 लाख, श्रीगोंदा 22 कोटी 31 लाख, पारनेर 31 कोटी 58 लाख, अहिल्यानगर 66 कोटी 40 लाख, एकूण 357 कोटी 47 लाख आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कर आकारणात सुधारणा करणे शक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना सूचना देऊन सुधारीत कर आकारणीसाठी प्रयत्न करण्यात आले.
दादासाहेब गुंजाळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत.

ताज्या बातम्या