अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
निवडणूक आयोगाने जिल्ह्यात जानेवारी-डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपत असलेल्या 15 ग्रामपंचायतीची प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील 6, संगमनेर 2, कर्जत 2, पारनेर 2 आणि अकोले तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे.
दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना, मतदार याद्याचा कार्यक्रम पूर्ण झाला असून सरपंचपदाचे आरक्षण देखील जाहीर झालेले आहे. आता या ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम घोषणेची जिल्हा ग्रामपंचायत शाखेला प्रतिक्षा असून लवकरच ती जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात चालूवर्षी डिसेंबरपर्यंत मुदत संपणार्या 15 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
यात प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, त्यावर हरकती व सुचना मागवणे त्या निकाली काढून झाल्यावर प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 15 ग्रामपंचायतीची प्रभाग रचना 22 जानेवारीला अंतिम करून ती 24 जानेवारीला राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण काढून झाल्यावर आधीच्या 84 आणि आताच्या 15 अशा 99 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.