देवळाली कॅम्प | वार्ताहर
नाशिकमधील शेवगे दारणा येथे बिबट्याने एका ४ वर्षीय चिमुकलीवर हल्ला केल्याची घटना घडली. मात्र, वयस्कर आजीच्या प्रसंगावधानाने आणि धाडसाने आजीने बिबट्याच्या दाढेतून नातीला वाचवले. या घटनेत नात जखमी झाली आहे तर आजीदेखील सुखरूप आहे.
अधिक माहिती अशी की, शेवगे दारणा येथील टेम्बी माळ भागातील अंकुश कासार यांच्या मळ्यातील घरानजीक असलेल्या पडवीत रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने समृद्धी कासार नामक चार वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला. मात्र, समृद्धीच्या जवळ असलेल्या आज गाजराबाई रामदास कासार यांनी बिबट्यावर प्रतिहल्ला करत बिबट्याच्या दाढेतून नातीला वाचवले.
यावेळी बिबट्याबरोबर झालेल्या झटापटीत मुलगी जखमी झाली आहे. तर आजीलाही किरकोळ जखम झाली आहे. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आजीने आरडाओरड करताच काही नागरिक परिसरात धावून आले. त्यामुळे बिबट्याने याठिकानाहून धूम ठोकली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे व त्याचे सहकारी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरु असून परिसरात बिबट्याचा संचार नेहमीच असतो. यामुळे याठिकाणी पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली जात आहे.




