Tuesday, November 10, 2026
Homeक्राईमCrime News : ‘ग्रो-मोअर’ फसवणूक प्रकरणी दोघांना अटक

Crime News : ‘ग्रो-मोअर’ फसवणूक प्रकरणी दोघांना अटक

14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी || शिर्डीच्या गुन्ह्यात कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गुंतवणूकदारांना दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या ‘ग्रो-मोअर’ कंपनीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संदीप भास्कर सावळे (रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) आणि सुबोध सुखदेव पाटील (रा. साईप्रसादनगर, शिर्डी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

राहाता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या याच प्रकरणातील गुन्ह्यात यापूर्वी अटक झालेले हे दोघे सध्या नाशिक येथील कारागृहात होते. त्यांना शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या स्वतंत्र गुन्ह्यात 9 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 14 ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ग्रो-मोअर कंपनीचा मुख्य संशयित आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांना दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी कंपनीत मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले. मात्र, आश्वासन दिल्याप्रमाणे परतावा आणि गुंतवणुकीची मूळ रक्कम न मिळाल्याने गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले. या प्रकरणी सुरूवातीला राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मुख्य संशयित भूपेंद्र सावळे याला राहाता आणि शिर्डी या दोन्ही पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती. संदीप सावळे आणि सुबोध पाटील यांनाही राहाता येथील गुन्ह्यात यापूर्वी अटक झाली होती. ते नाशिक येथील कारागृहात असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन शिर्डीच्या गुन्ह्यात अटक केली. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली असून, या कालावधीत त्यांच्याकडे पुढील तपास केला जाणार आहे.

पुरवणी दोषारोपपत्र दाखल करणार
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे याच्याविरूध्द राहाता आणि शिर्डी पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच संदीप सावळे आणि सुबोध पाटील यांच्याविरूध्द राहाता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आता या दोघांना शिर्डी येथील गुन्ह्यातही अटक करण्यात आल्याने या गुन्ह्यातदेखील त्यांच्याविरूध्द पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची ओवाळणी कोणाला?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड गुरुवारी म्हणजेच भाऊबीजच्या दुसर्‍या दिवशी होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बँकेत सहकार विकास आघाडीला स्पष्ट बहुमत...