Monday, June 15, 2026
Homeनगरशिर्डीतून ग्रो मोअर कंपनीसाठी साडेतीनशे कोटींची गुंतवणूक माझ्यासाठी आश्चर्याची बाब : डॉ....

शिर्डीतून ग्रो मोअर कंपनीसाठी साडेतीनशे कोटींची गुंतवणूक माझ्यासाठी आश्चर्याची बाब : डॉ. सुजय विखे

या पैशाच्या माध्यमातून एजंटगिरी तसेच सावकारकी करणार्‍यांवर कारवाई होणार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीमधून साडेतीनशे कोटींची गुंतवणूक ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीसाठी केली जात आहे, ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे. यामध्ये जवळपास अकराशे नागरिकांनी आपले पैसे गुंतवल्याचे समजते. त्यात 70 टक्के साई संस्थानमधील कर्मचारी आहेत. त्यापैकी 4 कायमस्वरूपी सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांनी या कंपनीत पैशाची गुंतवणूक करण्यासाठी एजंट गिरी केल्याचे समजते. ज्या कोणी या प्रकरणात एजंट गिरी तसेच या पैशाच्या माध्यमातून सावकारकी केली, अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या जातील. झटपट मार्गाने पैसे कमावण्याच्या अनेक स्कीममुळे नागरिकांचे पैसे बुडीत गेल्याच्या घटना निदर्शनास येऊन देखील नागरिक अशा स्कीममध्ये आपले पैसे गुंतवतात, ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

ते म्हणाले, गरिबांना पैसे मिळाले पाहिजे ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, परंतु हे पैसे मिळणे अत्यंत कठीण आहे आणि यासाठी खूप काळ जाईल. लवकर तोडगा निघेल असे नाही, परंतु ज्या नागरिकांचे यात पैसे गेले, त्यांच्या भावना मी समजू शकतो. यात सुदैवाने राजकीय व्यक्ती म्हणून आमचा काही सहभाग नाही आणि नव्हता देखील. नागरिकांनी त्यांचे पैसे परस्पर गुंतवले त्यांना कोणी बळजबरी केली नव्हती. आपण जेव्हा निर्णय घेतो, त्या निर्णयाचा फायदा होईल किंवा तोटा याचा विचार करायला हवा. यात ज्यांनी पैसे गुंतवले, त्यांचा सुरुवातीला फायदा झाला. अनेकांनी बंगले व गाड्या घेतल्या. ही योजना अशीच आहे की सुरुवातीला ही एवढी भावते की आपण पाचच्या जागेवर दहा रुपये गुंतवायला लागतो आणि नंतर त्यात अडकले जातो.

हेच शिर्डी बाबतीत घडले, जे दुर्दैवी आहे. आमच्या संवेदना सर्व गुंतवणूकदारांबरोबर आहेत; आम्ही त्यांच्या कठीण काळात त्यांच्या बरोबर आहोत. जेवढे प्रशासकीय बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून लावता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अचानक जर कमाईपेक्षा जास्त पैसा यायला लागला, तर समजून घ्यायला पाहिजे की आपण चुकीच्या मार्गावर आहोत. हे सर्वांनाच लागू होते. चुकीच्या मार्गाने आपण गेलो, तर त्याचे परिणाम वाईट होतात. या पैशातून ज्यांनी सावकारकी केली, त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे. दहा दिवसात त्यांच्यावर कारवाई होताना दिसेल. हे रॅकेट खूप मोठे आहे.

ही गोष्ट फक्त नंदुरबारपुरती मर्यादित नसून एकमेकांवर विश्वास ठेवून अनेकांनी यात पैसे गुंतवले. यातून एकच गोष्ट घेण्यासारखी आहे की आपण आपल्या कामातून मिळालेल्या पैशातच समाधानी राहिले पाहिजे. नाहीतर वेगळ्या मार्गाने पैसे कमवायच्या नादात आपले आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते, हे या गोष्टीतून सिद्ध झाले असल्याचे सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत ग्रुप मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून झालेल्या साडेतीनशे कोटी घोटाळ्याबाबत बोलताना आपले विचार स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...