नाशिक । प्रतिनिधी | Nashik
शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) व्यावसायिक विस्ताराचा गैरफायदा घेत सायबर चाेरट्यांनी (Cyber Thieves) एक हायटेक जाळे पसरवल्याचे समोर आले आहे. नामांकित ‘बीवायडी’ (बीवायडी) कंपनीची डीलरशिप मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाला चाेरट्यांनी हुबेहूब बनावट वेबसाईट आणि खोट्या ईमेलच्या माध्यमातून तब्बल १४ लाख ७ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या हायटेक सायबर फसवणुकीने उद्योग क्षेत्रांत भिती निर्माण केली आहे.
शहरातील पारिजात नगरातील जयपूर हाऊस (Jaipur House) परिसरात राहणारे व्यावसायिक गौरव ताराचंद गुप्ता यांना इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी गूगलवर अधिकृत शोध घेतला असता, सायबर चाेरट्यांनी तयार केलेली www.bydautodealership.in ही बोगस वेबसाईट त्यांच्या नजरेस पडली. संशयितांनी अगदी हुबेहूब मूळ कंपनीसारखाच बनावट लूक ठेवून गुप्ता यांना अर्जासाठी प्रवृत्त केले. यानंतर support@bydautodealership.dealer आणि info@bydcardealership.com यांसारख्या बनावट ईमेल आयडीवरून त्यांच्याशी संपर्क साधला.
दरम्यान, गुप्ता यांनी खात्री करण्यासाठी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना संबंधित मोबाईल नंबर बंद आढळले आणि फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांनी वापरलेल्या बँक खात्यांच्या (Bank Account) आणि आयपी अड्रेसच्या आधारे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुशीला काेल्हे तपास करत आहेत.
बनावट ‘झोनल हेड’ आणि खोट्या पावत्या
गुप्ता यांचा विश्वास संपादन करण्यासाठी संशयित मनीष परवा, महेश रेड्डी, पूजा सरकार (जिची ओळख ‘झोनल हेड बँकिंग चॅनेल्स पार्टनर’ अशी करून देण्यात आली) आणि एमडी आरिफ या नावांचा वापर करण्यात आला. लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) मिळवण्याच्या नावाखाली गुप्ता यांच्याकडून कधी ५ लाख ६१ हजार ५०० रुपये तर कधी ६ लाख ४४ हजार ५०० रुपये अशा वेगवेगळ्या रकमा बँक खात्यांवर भरण्यास भाग पाडले गेले. विशेष म्हणजे, पैसे भरल्यानंतर चाेरट्यांनी ग्राहकाला खोटे जीएसटी क्रमांक, अधिकृत पावती चलन आणि बनावट एनओसी फॉर्म देखील ईमेलवर पाठवले.
ऑनलाइन डीलरशिप घेताना ‘हे’ लक्षात ठेवा!
-डोमेन तपासणी: कंपनीच्या अधिकृत आणि खऱ्या वेबसाईटची खातरजमा केल्याशिवाय अर्ज करू नका.
-वैयक्तिक खाती टाळा: कोणत्याही अधिकृत कंपनीकडून खाजगी किंवा वैयक्तिक बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितल्यास सावध व्हा.
-ईमेल आयडीची खात्री: तोतया आणि संशयास्पद डोमेन असलेल्या ईमेलवरून येणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका.
-लेटर ऑफ इंटेंट: अशा कागदपत्रांची पडताळणी नेहमी कंपनीच्या थेट मूळ कार्यालयात जाऊनच करा.
-दलालांपासून दूर राहा: सोशल मीडिया किंवा अनधिकृत लिंक्सद्वारे संपर्कापासून सतर्क राहा.




