Sunday, April 26, 2026
Homeक्राईमAhilyanagar : शिर्डीतील मुख्य सूत्रधार सावळे विरोधात एक हजार पानी दोषारोपपत्र दाखल

Ahilyanagar : शिर्डीतील मुख्य सूत्रधार सावळे विरोधात एक हजार पानी दोषारोपपत्र दाखल

‘ग्रो मोअर’ घोटाळा || सुमारे 723 कोटींचा आर्थिक व्यवहार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

‘ग्रो मोअर’ कंपनीचा मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे (वय 27, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) याच्याविरूध्द आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचे सुमारे एक हजार पानी दोषारोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहाता येथील न्यायालयात दाखल केले आहे. ‘मनीट्रेल’ अहवालानुसार या संपूर्ण घोटाळ्यात तब्बल 723 कोटी रूपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, गुंतवणुकीवर दरमहा चांगला परतावा मिळेल या आमिषाने नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

सावळे आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांना दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार अनेकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. मात्र ठरलेला परतावा आणि मूळ गुंतवणूक न देता सर्वांची फसवणूक करण्यात आली. सुरूवातीला राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात देखील यासंदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

तपासादरम्यान 16 जुलै 2025 रोजी मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे याला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत चौकशीतून सावळे आणि त्याच्या सहकार्‍यांनी ‘ग्रो मोअर’ या नावाने अनेक कंपन्या स्थापन केल्याचे उघड झाले. त्यामध्ये ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स, ग्रो मोअर फिनकेअर सर्व्हिसेस, ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट आणि ग्रो मोअर स्वराज्य कॅपिटल या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमार्फत कोणतीही आर्थिक परवानगी नसताना नागरिकांकडून कोट्यवधी रूपयांची बेकायदेशीर वसुली करण्यात आली. त्यांना परतावा दिला गेला नाही व गुंतवणुकीची रक्कम देखील परत मिळाली नाही. पोलिसांनी गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवून, संबंधित पुरावे गोळा करून, भूपेंद्र सावळे विरोधात राहाता येथील एमपीआयडी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

पसार आरोपींचा शोध सुरू
या गुन्ह्यात भूपेंद्र सावळे अटकेत असला तरी इतर सहा संशयित आरोपी अद्याप पसार आहेत. त्यामध्ये संदीप भास्कर सावळे, राजाराम भटू सावळे (दोघे रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी), भाऊसाहेब आनंदराव थोरात (रा. राहाता), सुबोध सुकदेव पाटील (रा. साईप्रसादनगर, शिर्डी), तसेच अरूण रामदास नंदन आणि सीमा अरूण नंदन (दोघे रा. नाशिक) यांचा समावेश आहे. पसार संशयित आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू असून, त्यांच्या विरोधातही पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तसेच तपासादरम्यान नवीन संशयित आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शिर्डी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात देखील स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव ?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1300 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समिती कांद्याची (Onion) 3196 गोण्यांची...