
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पश्चिम आशियातील युध्दजन्य परिस्थितीचा परिणाम आता अहिल्यानगर शहरात जाणवू लागला असून एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिक, हॉटेल व्यावसायिक आणि रिक्षाचालकांचे हाल होत आहेत. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत असून एलपीजी पंपावर रिक्षांची सुमारे एक किलोमीटरपर्यंत रांग लागल्याचे चित्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिसत आहे.
घरगुती गॅस सिलेंडर मिळण्याचा कालावधीही वाढला आहे. पूर्वी 21 दिवसांनी सिलेंडर मिळत असताना आता 30 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिक सिलेंडर पदरात पाडून घेण्यासाठी गॅस एजन्सीपुढे तासनतास उन्हात उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या गर्दीमुळे काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. दरम्यान, व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेलचालक, खानावळ चालक व इतर व्यावसायिकांनी घरगुती सिलेंडर चढ्या दराने खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. काळ्या बाजारात घरगुती सिलेंडरचे दर दुप्पट झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये गॅसऐवजी पुन्हा चुली पेटवण्याची वेळ काही व्यावसायिकांवर आली आहे.
एलपीजी गॅसवर चालणार्या रिक्षाचालकांचीही मोठी गैरसोय होत आहे. शहरात एलपीजी गॅसचे केवळ तीन पंप असून त्यापैकी बसस्थानकाजवळील पंप रस्त्याच्या कामामुळे सध्या बंद आहे. त्यामुळे शहर, भिंगार व केडगाव परिसरातील रिक्षाचालक सक्कर चौकातील पंपावर गर्दी करत आहेत. पहाटेपासूनच रिक्षाचालकांना रांगेत उभे राहून तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. नवीन टिळक रस्त्यावर सक्कर चौकापासून नंदनवन लॉनपर्यंत तसेच स्टेशन रस्त्यावर उड्डाणपुलाखाली रिक्षांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. गॅस मिळेल की नाही, या भीतीने अनेक रिक्षाचालक चिंतेत आहेत. रिक्षावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न यामुळे गंभीर बनला आहे.
दरात मोठी वाढ
गॅसच्या तुटवड्याचा फायदा घेत दरातही मोठी वाढ झाल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. चार दिवसांपूर्वी 65 रूपये किलो दराने मिळणारा एलपीजी गॅस दोन दिवसांपूर्वी 75 रूपये किलो दराने तर गुरूवारी 85 रूपये किलो दराने विक्री होत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. गॅस मिळाला नाही तर संसार कसा चालवायचा, असा प्रश्न उपस्थित करत रिक्षाचालकांनी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून दरवाढ रोखावी व पुरेसा गॅस पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.
बुकिंग बंद
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युध्दामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. प्रशासनाकडून घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात बुकिंग होत नसल्याच्या आणि बुकिंग झाल्यानंतरही सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तक्रारींसाठी जाहीर करण्यात आलेले दूरध्वनी क्रमांकही लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक
महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन आधीच कठीण झाले असताना केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या किमती वाढवून जनतेची लूट चालवली असल्याचा आरोप करत अहिल्यानगर तालुका काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती तात्काळ कमी कराव्यात तसेच घरगुती व व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अरूण मस्के, उपाध्यक्ष भरत बोडखे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेश भाटिया, गणेश तोडमळ, भिंगार काँग्रेस शहराध्यक्ष रिजवान शेख आदी उपस्थित होते.




