Sunday, September 27, 2026
Homeराजकीयज्ञानेश कुमार हे 'देशाचे दुश्मन', आता ते...; संजय राऊतांचा हल्लाबोल

ज्ञानेश कुमार हे ‘देशाचे दुश्मन’, आता ते…; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई । Mumbai

निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद आणि ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेवरून पेटलेला राजकीय वणवा दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला आहे. दोन निवडणूक आयुक्तांनीच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर आक्षेप घेतल्याची बातमी बाहेर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

यातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर अतिशय आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे ‘देशाचे दुश्मन’ असल्याची प्रखर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मुख्य निवडणूक आयुक्त हे देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. भाजपला निवडणुकीत थेट फायदा व्हावा, यासाठीच निवडणूक आयोगाकडून लोकशाहीविरोधी निर्णय घेतले जात आहेत.” संपूर्ण देशात तब्बल १३ कोटी तर एकट्या महाराष्ट्रात तब्बल २ कोटी वैध मतदारांची नावे बेकायदेशीरपणे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. निवडणूक आयोगाने काल बैठक घेऊन सर्व निर्णय एकमताने झाल्याचे स्पष्टीकरण दिले असले, तरी ही निव्वळ ‘सारवासारव’ असल्याचे राऊत यांनी नमूद केले.

मतदार याद्यांमधील गैरप्रकार आणि निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली आहे. महाराष्ट्राची राजकीय ताकद आणि जनतेचा रोष दाखवण्यासाठी येत्या ४ तारखेला सर्वपक्षीय एकत्र विशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“हा भारताच्या इतिहासातील असा प्रचंड मोठा मोर्चा असेल, जो संपूर्ण जगाला पाहावा लागेल,” असा दावा करत राऊत यांनी मनसे, शिवसेना आणि राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी या मोर्चात ताकदीने सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच, सर्वोच्च न्यायालयही सध्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत देशात निर्माण होत असलेल्या संतापाच्या लाटेमुळे न्यायालयाला अखेर न्याय द्यावाच लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे सांगत संजय राऊत यांनी आगामी काळात या आंदोलनाची धार अधिक तीव्र होण्याचे संकेत दिले आहेत.

ताज्या बातम्या

विराट कोहलीने दिले निवृत्तीचे संकेत; म्हणाला, “2027 चा विश्वचषक हा…”

0
मुंबई । Mumbai भारतीय क्रिकेट संघाला कठीण प्रसंगातून अनेकदा विजयपथावर नेणारा आणि मैदानात आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli)...