कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
गुजरात राज्यातील साईभक्ताला अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून लूटमार केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात घडली. फिर्यादी मोहित पाटील यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी मोहित पाटील आपल्या सहकार्यांसोबत इर्टिगा नंबर जी जे 05 आर.वाय 1833 गाडीतून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चालले होते.
त्यांची गाडी लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता दुसर्या ईर्टीका एम एच 03 सी ई (पुढील नंबर माहीत नाही) या अनोळखी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांनी ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी थांबवली. यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत सोने चांदीचे दागिने मोबाईल, रोख रकमेसह एक लाख आठशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी मोहित पाटील यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आठ जणांविरोधात गुर नंबर कलम 40 /2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310 (2), 126 (2),352, 351,(2)(3) आर्म अॅक्ट 3/25,4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.