कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon
आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःची गुन्हेगारी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न कोपरगाव तालुक्यातील दोन तरुणांना चांगलाच महागात पडला आहे. इन्स्टाग्रामवर रायफल आणि पिस्तुलसह फोटो पोस्ट करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणार्या कोळपेवाडी येथील दोन संशयितांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावर शस्त्रास्त्रांसह फोटो टाकून ‘भाईगिरी’ करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
कोळपेवाडी येथील तोफिक बिलाल बागवान (वय 26) या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हातात रायफल आणि पिस्तूल घेतलेला फोटो पोस्ट केला होता. हा फोटो अल्पावधीतच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ज्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित तरुणाचा एखाद्या अतिरेकी संघटनेशी संबंध आहे का? अशा चर्चांना उधाण आल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कोपरगाव तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या पथकाने थेट कोळपेवाडी गाठून तोफिक बागवान याच्या घराची झडती घेतली. यावेळी त्याच्या घरात एक छोटी तलवार मिळून आली.
पोलिसांनी तोफिक आणि त्याचा मित्र इस्माईल रज्जाक शाह या दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी हा फोटो एआयच्या माध्यमातून एडिट करून तयार केल्याचे कबुल केले. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी आणि सोशल मीडियावर हवा करण्यासाठी हा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जरी फोटो बनावट असला, तरी समाजात भीती पसरवल्याप्रकरणी आणि घरात विनापरवाना तलवार ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. अवघ्या काही तासांत हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आणि सायबर सेलच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. सोशल मीडियावरील प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष असून, अशा प्रकारचे कृत्य करणार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.





