Friday, September 25, 2026
Homeराजकीयमनोज जरांगे हे एकनाथ शिंदेंचे प्यादे; गुणरत्न सदावर्तेंचा थेट हल्लाबोल

मनोज जरांगे हे एकनाथ शिंदेंचे प्यादे; गुणरत्न सदावर्तेंचा थेट हल्लाबोल

मुंबई । Mumbai

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. मात्र, आंदोलन सुरू होताच प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच गंभीर आरोप केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नवा भूकंप आला आहे. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मराठा नेत्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा सदावर्ते यांनी केला आहे.

- Advertisement -

पत्रकारांशी बोलताना सदावर्ते म्हणाले, “मनोज जरांगे हे स्वतंत्र नसून ते केवळ एक प्यादे आहेत. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सेवक म्हणून काम करत आहेत. जरांगे हे मुख्यमंत्र्यांच्या घराला टार्गेट करण्याची भाषा करतात, तरीही एकनाथ शिंदे मूग गिळून गप्प का बसतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर सत्ताधारी मंत्री विखे पाटील यांच्यासारखे नेतेही जरांगेंविरोधात मवाळ भूमिका घेतात आणि त्यांचा कधीही निषेध करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

आपल्या वक्तव्यात सदावर्ते पुढे म्हणाले की, “मला राज्यातील अनेक मराठा बांधवांचे फोन येत असून त्यांना वेगळे आरक्षण नको तर ‘ईडब्लूएस’ (EWS) आरक्षण हवे आहे.” तसेच संविधानात ‘पाटील’ नावाचे कोणतेही वेगळे पद नसून गावातील पाटील हा बौद्ध किंवा आदिवासी समाजाचाही असू शकतो, असे विधान त्यांनी केले.

गुणरत्न सदावर्तेंच्या या आरोपानंतर महायुतीमधील शिंदे गटाच्या गोटात तीव्र अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे. मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र आखले जात आहे का? आणि यामागे नेमके कोण आहे, यावर शिवसेनेच्या वरिष्ठ वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी पक्षाकडून लवकरच अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गणेश विसर्जन मिरवणुकीत एकाचा मृत्यू; भिंगारमध्ये तणाव

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भिंगार मधील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शुक्लेश्वर तरूण मंडळाचे कार्यकर्ते दीपक रामकिसन वाघस्कर (वय 50, रा. वाघस्कर मळा, भिंगार) यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला...