संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची विक्री केली जात असून याकडे पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे वृत्त दैनिक सार्वमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात येवून करवाई करत जवळपास चौदा हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला असल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणलेले आहे.
संगमनेर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची सर्रासपणे विक्री होत आहे. याबाबत शहर पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती असून देखील कारवाई केली जात नव्हती. यामुळे गुटखा विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. याबाबत दैनिक सार्वमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. वास्तविक पाहता शहर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.7) शहरातील इंदिरानगर व रहेमतनगर या दोन ठिकाणी छापा टाकून जवळपास चौदा हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संदीप दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी विजय चंद्रकांत भागवत, मोसीन उर्फ मोबीन खलील शेख व आणखी एक अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाची उदासीनता…
वास्तविक पाहता संगमनेर शहरात तसेच पठार भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा विक्री होत आहे. रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी हा गुटखा खाली केला जातो आणि यानंतर सर्वत्र पुरवला जात आहे. यामुळे खर्याअर्थाने गोडाऊनवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. केवळ छोट्या दुकानदारांवर कारवाई होत आहे. मोठ्या गुटख्या विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. पण याकडे अन्न व औषध प्रशासन विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे.