Thursday, July 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोहनदरी शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, महिला अधीक्षिका आणि वर्ग शिक्षक निलंबित

मोहनदरी शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, महिला अधीक्षिका आणि वर्ग शिक्षक निलंबित

पुनदखोरे | संदीप जगताप

- Advertisement -

मोहनदरी शासकीय आश्रमशाळा विद्यार्थीनी प्रसूती प्रकरणी मुख्याध्यापक,महिला अधीक्षिकासह वर्ग शिक्षक निलंबित केले असून प्रकल्प अधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांनी धडक कारवाई केली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणार्‍या मोहनदरी शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन १४ वर्षीय विद्यार्थीनीने काही दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मंत्रालय तसेंच आदिवासी विकास विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत तसेच आश्रमशाळेतील प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणी प्रकल्प अधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीत विद्यार्थिनींच्या देखरेखीत तसेच प्रशासकीय जबाबदार्‍या पार पाडण्यात गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आल्याने मोहनदरी शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांच्यासह वर्ग शिक्षक तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

संबंधित अधिकार्‍यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक दक्षता न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, या निष्काळजीपणामुळे ही गंभीर घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीत नमूद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जबाबदार अधिकार्‍यांविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, विद्यार्थिनीला आवश्यक वैद्यकीय उपचार व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या यंत्रणांची प्रभावी अंमलबजावणी, नियमित देखरेख, समुपदेशन आणि तक्रार निवारण व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. मोहनदरी आश्रमशाळेतील ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवणारी ठरली असून, आदिवासी विकास विभागाने यापुढे अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व आश्रमशाळांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे संकेत दिले आहेत.

ताज्या बातम्या

दुगारवाडी धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू

0
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध दुगारवाडी धबधबा येथे फिरण्यासाठी आलेल्या नाशिक येथील २० वर्षीय युवकाचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली...