Monday, September 7, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा जोर कायम; पुढील दोन दिवस 'यलो अलर्ट'

राज्यात पावसाचा जोर कायम; पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’

मुंबई । Mumbai

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस या पावसाची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisement -

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण भागात जोरदार पावसाचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भात हलक्या सरींची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात सर्वाधिक 120 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांची पिके आणि नागरी भागातील व्यवस्था यावर या पावसाचा परिणाम दिसून येतो आहे.

आज (२२ सप्टेंबर) अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, उत्तर अंदमान समुद्रात म्यानमारच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून, आज (२२ सप्टेंबर) येथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीपासून उत्तर तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा पसरला आहे. तसेच, दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत २५ सप्टेंबरपर्यंत नव्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत मिळत आहेत. किनाऱ्याकडे सरकत असताना ही प्रणाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

हवामान तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, बंगालच्या उपसागरात २२ सप्टेंबरपासून निर्माण होणारे कमी दाब क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत तीव्र होणार आहे. यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई परिसरात २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाचा जोर वाढेल.

विशेषत: कोकण किनारपट्टी, मुंबई आणि गुजरातमध्ये २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान १६ ते २० ऑगस्टदरम्यान झालेल्या पावसासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनानेही सतर्कता बाळगली असून, नागरिकांना पूरस्थिती, वाहतुकीतील अडथळे आणि विजांच्या कडकडाटापासून सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्या

MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; पुण्यात मोर्चा, रोहित पवारांचा सरकारवर...

0
पुणे । Pune महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात आज पुण्यातील रस्त्यांवर तरुणाईचा प्रचंड असंतोष उफाळून आला. लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि MPSC...