नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अद्याप चर्चा झाली नाही. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज पोस्ट करत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केले आहे. तर पंतप्रधानांच्या या प्रतिक्रियेनंतर कॉकरोच जनता पार्टीकडून आपली प्रतिक्रिया देत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचे बघायला मिळाले आहे.
अभिजीत दिपकेंची खोचक प्रतिक्रिया
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घोषणा केली. फास्ट-ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा मोदींनी केली. देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. दोषींची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी ते म्हणाले कि ‘Nothing is more important than the welfare and future of our youth!’ यावर आता अभिजित दिपकेंनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेयर करत ‘ Hi my name is Nothing’ असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.
संपूर्ण दिल्ली बंद करायला तयार पण धर्मेंद्र प्रधान यांना हटवायला नाही
दिल्ली मेट्रोने आज (23 जुलै) 16 स्थानके बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. काँकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दीपके यांनी डीएमआरसीच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मोदी संपूर्ण दिल्ली बंद करायला तयार आहेत, पण धर्मेंद्र प्रधान यांना हटवायला नाही.”
भाजप गुंड पाठवून चिथावणी देत आहे
पुढे बोलताना अभिजित दीपके म्हणाले कि, “भाजप गुंड पाठवून आंदोलकांना चिथावणी देत आहे. ‘आंदोलनात मुद्दाम अडथळा आणण्यासाठी बाहेरून लोकांना पाठवले जात आहे. आम्ही महिनाभर इथे बसलो आहोत. महिनाभरात अशी कोणतीही घटना घडली नाही, पण आता आंदोलन तीव्र झाल्याने भाजप बाहेरून गुंड पाठवून मुद्दाम लोकांना चिथावणी देत आहे. भाजपचेच लोक दगडफेक करत आहेत. पोलीस इथे दगडांनी भरलेले ट्रक आणतात. भाजपचे गुंड येतात, दगडफेक करतात आणि मग सरन्यायाधीशांची बदनामी करतात.” असेही ते म्हणाले.




