Sunday, June 14, 2026
HomeनगरAhilyanagar : अतिवृष्टीमुळे चार तालुक्यातील 18 घरांची पडझड

Ahilyanagar : अतिवृष्टीमुळे चार तालुक्यातील 18 घरांची पडझड

पाथर्डी तालुक्यातील 200 हेक्टर क्षेत्रातील पिकांचेही नुकसान

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी, श्रीरामपूर, नेवासा व जामखेड या चार तालुक्यातील 18 घरांची पडझड झाली असून पाथर्डी तालुक्यातील 200 हेक्टर क्षेत्रातील फळबागांसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः टाकळीमानूर महसूल मंडलात 386 शेतकर्‍यांचे 163 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी 88 मिलीमीटर पाऊस नोंदवला जातो. मात्र यावर्षी मे महिन्यात तब्बल 288 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्टच्या सुरूवातीला अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला. सरासरीच्या केवळ 70 टक्के पावसाची नोंद झाली. मात्र ऑगस्टच्या अखेरीस, 29 ऑगस्ट रोजी पावसाने जोरदार पुनरागमन केले आणि खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला. मात्र या दिवशी नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली.

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील 15 महसूल मंडलांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. शेवगाव तालुक्यात शेवगाव (74.3), बोधेगाव (79), चापडगाव (79), ढोरजळगाव (68), एरंडगाव (70.8), दहिगाव-ने (70.8), मुंगी (75.3) इतका पाऊस नोंदवला गेला. तर पाथर्डी तालुक्यात पाथर्डी (69.3), माणिकदौंडी (69.3), टाकळीमानूर (71.5), कोरडगाव (70.8), मिरी (68.5), तिसगाव (65.3), खरवंडी (71.5), अकोले (70.8) मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

या अतिवृष्टीमुळे चार तालुक्यातील 18 घरांची पडझड झाली आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील 9, नेवासा तालुक्यातील 6, जामखेड तालुक्यातील 2 आणि श्रीरामपूर तालुक्यातील 1 घराचा समावेश आहे. तसेच टाकळीमानूर महसूल मंडलात चार गावे बाधित झाली. येथे 386 शेतकर्‍यांचे 163 हेक्टर क्षेत्रातील बाजरी, तूर, मूग, कापूस, उडीद व केळी पिकांचे नुकसान झाले. पाथर्डी महसूल मंडलातील एक गाव बाधित झाले असून 117 शेतकर्‍यांचे 37 हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे.

दरम्यान, पावसामुळे काही भागात नुकसान झाले असले तरी खरीप हंगामाला या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात खरीपाची पेरणी 100.74 टक्के पूर्ण झाली आहे. 7 लाख 16 हजार 208 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून 7 लाख 21 हजार 479.81 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सध्या पिके फुलोरा व बोंडे लागण्याच्या अवस्थेत असून परिस्थिती समाधानकारक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...