कोहोर | वार्ताहर Kohor
पेठ तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. सुरुवातीला तालुक्यातील सीमा भागात पावसाचा जोर अधिक असताना, आता कोहोर ,जोगमोडी, करंजाळी,नाचलोंढी,कुंभाळे, आणि पेठसह पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. बुधवारी (दि.२०) पहाटेपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तालुक्यात नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने काही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
तालुक्यात सीमावर्ती भागात पावसाने आधीच हजेरी लावली होती. त्या तुलनेत पेठ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, आज पहाटेपासून पावसाचा जोर इतका वाढला की, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक ठिकाणी पूल आणि रस्त्यांवरून पाणी वाहू लागल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे.
या मुसळधार पावसामुळे तालुक्यांमधील अनेक गाव-पाड्यांचे जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळावे, नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी नदी पुरातून ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नये.असे आवाहन देखील केले जात आहे.




