
मुंबई | Mumbai
भारताचा टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अखेर या वर्षीच्या सुरुवातीला विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच राष्ट्रीय संघातून वगळल्याबद्दल मौन सोडले आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनलवर सूर्यकुमार म्हणाला की, त्याला 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि पुढील टी-20 विश्वचषकापर्यंत संघाचे नेतृत्व करण्याची आशा होती. 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर, निवड समितीने त्याला कर्णधारपदावरून हटवले आणि श्रेयस अय्यरला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या संघांमध्येही त्याचा समावेश नव्हता. निवड समितीने त्याच्या खराब फॉर्मचे कारण दिले.
२०२५ मध्ये सूर्यकुमारला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. मात्र टी-२० विश्वचषकात वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध सामन्यात त्याची लक्षवेधी खेळी पाहायला मिळाली. तसेच कर्णधार म्हणून त्याची कामगिरी सरस होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकही T-20 मालिका गमावली नाही आणि अखेरीस मायदेशात टी-२० विश्वचषकावरही मोहोर उमटवली.
तेव्हा मी नेहमी हसत राहतो, मी शांत राहतो
आकाश चोप्रा याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “जेव्हा संघात माझे नाव नव्हते, तेव्हा मी फक्त हसलो. कारण जेव्हापासून मी संघासोबत क्रिकेट खेळत आहे, जेव्हा कधी माझ्यावर दडपण असते किंवा गोष्टी माझ्या मनासारख्या घडत नसतात, तेव्हा मी नेहमी हसत राहतो. मी शांत राहतो. मला जेव्हा-जेव्हा चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.”
तुम्हाला योग्य वेळ वाटेल तेव्हा मला बोलवा
सूर्या म्हणाला, “संघाच्या घोषणेच्या तीन दिवस आधी निवड समितीने माझ्याशी फोनवरून संवाद साधला. मला सांगण्यात आले, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी माझी संघात निवड होणार नाही. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.’ मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही कारण त्यात माझी काही चूक नव्हती.” सूर्या निवड समितीला म्हणाला, “हा निर्णय निश्चितपणे संघाच्या हिताचाच असेल. तुम्ही निर्णय घेतला आणि मला कळवले. काही अडचण नाही. मी खेळत राहीन. तुम्हाला योग्य वेळ वाटेल तेव्हा मला बोलवा.”
त्यांच्या विचारांचा आदर करणे महत्त्वाचे आहे
” आता सध्या परिस्थिती आहे, याचा मी कधीच विचार केला नव्हता. २०२६ मध्ये आल्यानंतर मला वाटले होते की, मी आणखी दोन वर्षे या संघाला पुढे घेऊन जाईन. ऑलिम्पिक येईल. त्यानंतर आणखी एक टी-२० विश्वचषक आणि नवी आव्हाने असतील. पण त्याच वेळी, तुम्ही जे विचार करता आणि समोरची व्यक्ती जे विचार करते, या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यांच्या विचारांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. जर त्यांना वाटले असेल की भविष्याच्या दृष्टीने हा योग्य निर्णय आहे, तर त्यांनी तो निर्णय घेतला. मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मला वाटले की तो त्यांचा निर्णय होता. भविष्यात जर हा संघ दुसऱ्या कोणाच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करू शकला, तर त्यात कोणतीही अडचण नाही,” असेही सूर्यकुमारने स्पष्ट केले.
होय, मी थोडा निराश नक्कीच होतो
मात्र, आगरकर यांच्या निर्णयानंतर आपल्याला मानसिक संघर्ष करावा लागला, हे सूर्यकुमारने मान्य केले. कारण त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकही मालिका गमावली नव्हती आणि भारताची टी-२० मधील कामगिरीही उत्कृष्ट होती.”त्यांनी निवडलेला संघ मी पाहिला आहे. मी श्रेयससोबतही खूप क्रिकेट खेळलो आहे. मला माहीत आहे की तो एक चांगला खेळाडू, एक चांगला माणूस आणि एक चांगला कर्णधारही आहे. त्यामुळे त्याला कर्णधार का बनवले? असा प्रश्न माझ्या मनात नव्हता. पण होय, मी थोडा निराश नक्कीच होतो. कारण गेल्या दोन वर्षांत तुम्ही एकही मालिका गमावली नव्हती. तुम्ही विश्वचषक आणि आशिया चषक जिंकला आहे. मग तुम्हाला त्याच गोष्टी पुढे नेण्याची गरज असते. जेव्हा सर्व काही चांगले चालले आहे, तेव्हा बदलाचे कारण काय? हाच विचार माझ्या डोक्यात घोळत होता. मी दीड महिना घरीच बसून होतो,” असेही सूर्यकुमारने सांगितले.
मी विचार करत होतो, हे असे कसे होऊ शकते?
“मी विचार करत होतो, हे असे कसे होऊ शकते? हे कसे शक्य आहे? आपण नुकताच विश्वचषक जिंकला आहे. होय, आयपीएल (IPL) माझ्या अपेक्षेनुसार गेले नाही. आम्ही घरी बसून होतो. मित्र आले, कुटुंबीय आले. सगळे म्हणाले की ठीक आहे, हा आयुष्याचा एक भाग आहे. पण जेव्हा ते घराबाहेर जातात, तेव्हा आपण घरात एकटेच उरतो,” असे त्याने स्पष्ट केले.




