
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
निमाणी बस स्थानकावरून (Nimani Bus Stand) बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा (Crowd) फायदा घेत दोन महिलांच्या गळ्यातील तब्बल ६० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळसूत्रे शिताफीने लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सोनी सुनील गांगुर्डे (वय २१, रा. न्यू जुई १ बिल्डिंग, जुईनगर, म्हसरूळ) आणि पूजा दिगंबर पवार या दोघी शुक्रवारी (ता. २८) सकाळी पावणेनऊच्या सुमारास निमाणी बस स्थानकातून साक्री-पिंपळनेर बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसमध्ये (Bus) चढणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात भामट्याने दोन्ही महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची पोत चोरून नेली.
काही वेळाने गळ्यातील दागिने गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांनी तात्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या चोरीमध्ये सोनी गांगुर्डे यांचे (३ ग्रॅम) आणि पूजा पवार यांचे (३ ग्रॅम) असे एकूण ६ ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी पंचवटी पोलिसांत (Police) गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अंमलदार नवनाथ रोकडे पुढील तपास करत आहेत.




