येवला | प्रतिनिधी Yeola

तालुक्यात आज, अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास रेंडाळे, नगरसुल, न्याहारखेडे परिसरात गारांसह जोरदार पाऊस झाल्याने शेतकरीवर्गाची मोठी धांदल उडाली. अकस्मात आलेल्या या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने मोठे नुकसान झाले. तसेच मिरची, डोंगळे व टमाटे पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
काल देखील, शुक्रवारी, (दि. २२) सायंकाळी, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात शहरासह तालुका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अंदरसूल, देवळाणे, बोकटे, दुगलगावसह परिसरातील गावांना वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसाने परिसरात शेतातील कांदे, जनावरांचा चारा भिजला तर काही ठिकाणी ऊस आडवा पडला. शेतातील डोंगळ्यांचे नुकसान झाले तर रस्त्यालगत असणारी अनेक झाडे उन्मळून पडली. कांदा चाळीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दुगलगाव येथील शेतकरी विश्वनाथ मोरे यांचे सुमारे दोनशे क्विंटल कांदे पावसाने भिजल्याने शेतकरी मोरे यांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे काही ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून आडगाव चोथवा येथे शेडनेट पडून लाखोंचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विहिरीवर बसवलेले सोलर पॅनेलचेही मोठे नुकसान झाले आहे. सलग तीन दिवस झालेल्या वादळी पावसाने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
देवळाणे येथे घराचे छत कोसळून आयुष जाधव (वय ५ वर्ष), कडूबाई जाधव (५५), मंड्याबाई पगारे (७५) हे तिघे जखमी झाले. जखमींवर अंदरसुल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉल करून जखमींची विचारपूस केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय कक्षाचे वतीने जखमींचा वैद्यकीय खर्च केला जाणार असून शासनाच्या माध्यमातून घर दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी सांगितले.




