Tuesday, May 12, 2026
Homeमहाराष्ट्रRain Alert : राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं कमबॅक; 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

Rain Alert : राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं कमबॅक; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई । Mumbai

राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद होत आहे. पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि रायगड या भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि पुण्यातही पावसाची सुरुवात झाली असून काही भागांत हलक्याफुलक्या सरी कोसळत आहेत.

- Advertisement -

मुंबई, ठाणे परिसरात हवामान खात्याने पुढील तीन ते चार तासांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजता हवामान विभागाने हा अलर्ट जारी केला. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

दरम्यान, कोकणात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे, तर काही भाग जलमय झाले आहेत. रायगड जिल्ह्यात विशेषतः पावसाचा प्रचंड फटका बसला असून भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केला आहे. परिणामी, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना १५ जुलै रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरही पावसाचा मोठा परिणाम जाणवत असून वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. काही ठिकाणी लहान दरडी कोसळल्याने अडथळे निर्माण झाले आहेत. याच दरम्यान, उत्तर नगर जिल्ह्याच्या भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. परिणामी डोंगरदर्‍यांतील धबधबे पुन्हा वाहू लागले असून पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे.

भंडारदरा धरणाचा साठा 11039 दलघफू क्षमतेपैकी 8015 दलघफू (72.61%) इतका झाला आहे. या धरणातून 840 क्युसेसने विसर्ग सुरू आहे. तर निळवंडे धरणात 7067 दलघफू (84.86%) साठा असून तिथून 300 क्युसेसने विसर्ग करण्यात येत आहे. वाकी तलावही भरून वाहू लागला असून त्याचा विसर्ग 198 क्युसेसने सुरू आहे. पावसामुळे संपूर्ण पाणलोट परिसरात थंडीचा अनुभव येत असून कोकणकडा, कळसूबाई शिखर धुक्याने झाकले गेले आहे. या भागात निसर्गरम्य वातावरण तयार झाले असून पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्या

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित दहा सदस्यांचा १४ मे रोजी शपथविधी

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक सदस्या अशा दहा नवनिर्वाचित सदस्यांचा...