अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये नवरात्र उत्सवानिमित्ताने सातव्या माळेच्या दिवशी मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत 2025-26 चा पाण्याचा ताळेबंद सादर करण्यात आला. नवरात्र उत्सवात पाण्याचा ताळेबंद सादर करण्याची ही परंपरा सलग 21 व्या वर्षीही कायम ठेवण्यात आली. यावेळी हिवरेबाजाराकडून भविष्यातील 2.67 कोटी लिटर पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले.
या ग्रामसभेला आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, सरपंच विमलताई ठाणगे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन छबुराव ठाणगे, सेवा सोसायटीचे चेअरमन रामभाऊ चत्तर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, यशदा पुणे येथे जागतिक नदी दिनानिमित्त आयोजित नदीसाठी युवा शक्ती या कार्यक्रमात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, यशदा महासंचालक सुधांशु कुमार, उपमहासंचालक डॉ. शेखर गायकवाड, अतिरिक्त महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत हिवरे बाजार गावाचा 2025-26 चा पाण्याचा ताळेबंद प्रकाशित करण्यात आला.
यावेळी पद्मश्री पवार यांनी सांगितले की, 1995 पासून हिवरे बाजार येथे पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकांचे नियोजन केले जात असून सुरुवातीला फक्त एकच पर्जन्यमापक होता. मात्र 2004 नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसविल्याने ताळेबंद अधिक अचूक तयार होऊ लागला.यंदाच्या पाण्याच्या ताळेबंदानुसार यावर्षी 24 दिवसांत एकूण 524 मि.मी. पाऊस झाला असून त्यातून 511.86 कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. त्यापैकी गावाच्या वापरासाठी 342.54 कोटी लिटर पाणी उपलब्ध असून गावाच्या विविध वापरासाठी वार्षिक गरज 339.86 कोटी लिटर इतकी आहे.
त्यात लोकसंख्या व जनावरांसाठी पिण्याचे पाणी 7.71 कोटी लिटर, खरीप पिकांसाठी 132.80 कोटी लिटर, रब्बी पिकांसाठी 126.5 कोटी लिटर, उन्हाळी पिकांसाठी (प्रस्तावित) 24 कोटी लिटर, बारमाही पिकांसाठी 42 कोटी लिटर व इतर वापरासाठी 6.85 कोटी लिटर अशी गरज असून एकूण 325.31 कोटी लिटर पाणी आवश्यक आहे. याशिवाय भविष्यासाठी 2.68 कोटी लिटर पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे.
जलअंदाजपत्रक 2025-26
2025-26 मध्ये गावात 525 मी.मी. पाऊस झाला. यात पावसाचे एकूण दिवस 24 असून यातून 511. 86 कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले. यातील 179.15 कोटी लिटर पाण्याचे बाष्प होऊन हवेत परत जाणार असून वाहून जाणारे पाणी 40.95 कोटी लिटर आहे. तर 87.2 लिटर पाणी जमीनीत आणि 156.56 कोटी लिटर पाणी हे मातीत मूरणारे आहे. तसेच 51.78 लिटर पाणी हे साठवता येणार पाणी असून जलसंधारणाच्या कामामुळे 50. 78 कोटीचे अधिकचे पाणी जमिनीत मुरणारे आहे. गावासाठी 339. 86 कोटी उपलब्ध होणार असून गावाची वार्षिक गरज ही 339.54 कोटी आहे. पिण्यासाठी 7.71 कोटी आवश्यक असून गावासाठी खरीप, रब्बी, उन्हाळी आणि बारमाहीसाठी 325 कोटी लिटर पाण्याची करत असून इतर वापरासाठी 6.85 लिटर पाण्याची गरज असल्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.





