जालना | Jalna
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या एका महत्त्वाच्या बैठकीदरम्यान अचानक मधमाशांच्या हल्ल्याने मोठा गोंधळ उडाला. आज दुपारी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी बैठक बोलवली होती. बैठक सुरु होती, त्यावेळी अचानक मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे काही वेळासाठी बैठकीत गोंधळाचं वातावरण झाले होते. दरम्यान, मधमाश्यांनी हल्ला करताच समन्वयकांनी जरांगे पाटलांच्या अंगावर उपरणी टाकून सुरक्षित ठिकाणी नेले.
नेमके काय घडलं?
आज रविवारी (दि. 21) मराठवाड्यातील निवडक समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातील समन्वयकांशी चर्चा करणार होते. या बैठकीत मनोज जरांगे पाटील आरक्षण चळवळीची पुढील दिशा आणि आगामी आंदोलनाची रणनीती यावर चर्चा करणार होते. सकाळपासूनच मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समन्वयक आणि गावोगावीचे प्रतिनिधी येथे जमले होते. मात्र, चर्चा सुरू होण्याआधीच अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्यामुळे एकच गोंधळ उडाला.
या हल्ल्यात अनेक समन्वयक आणि कार्यकर्त्यांना मधमाशांनी चावे घेतल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि लोकांनी इकडे-तिकडे पळापळ सुरू केली.
जरांगेंना उपरणाने झाकले
मधमाशांनी हल्ला करताच काहींनी झाडाझुडपांकडे धाव घेतली तर काहींनी अंगावर उपरणी, शाल किंवा टॉवेल टाकून अंग झाकण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, समन्वयकांनी तात्काळ मनोज जरांगेंना सुरक्षित स्थळी हलवलं. कोणतीही गंभीर इजा होऊ नये म्हणून त्यांना त्वरित बैठकस्थळी बाजूला नेण्यात आलं. सहकाऱ्यांनी गळ्यातील उपरणी काढून मनोज जरांगे पाटील यांना झाकले आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याची माहिती समोर येत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




