अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची लेखी परीक्षा मंगळवारपासून (दि.11) सुरू होत असून दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून परीक्षेसाठी जिल्ह्यात 109 केंद्र असून 63 हजार 658 विद्यार्थी आहेत. परीक्षा केंद्रावरील सरसकट शिक्षक, शिक्षकेतर आणि परिचर यांच्या आदला-बदल करण्यास शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर आता गेल्या पाच वर्षात परीक्षेत गैरप्रकार झालेल्या केंद्रांवरील पर्यवेक्षण यंत्रणेत बदल करण्यात आला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.
दरम्यान परीक्षेला येणार्या विद्यार्थ्यांना आपला परीक्षेचा बैठक क्रमांक कोठे आहे हे माहिती नसते. त्याठिकाणी परीक्षा हॉलमध्ये जाताना अंगझडती घेतली जाते. त्यामुळे अर्धा तास अगोदर केंद्रावर पोहचावे, असे आवाहन परीक्षा बोर्डाच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात 11 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान बारावीचे तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होत आहे. परीक्षेदरम्यान गणित व इंग्रजीच्या पेपरला गटशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा केंद्रावर पूर्ण वेळ बैठेपथक तैनात केले जाणार आहे. तसेच सर्व तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. केंद्रस्तरावरही स्वतंत्र दक्षता पथक कार्यरत राहणार आहे.
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी 109 केंद्र असून 63 हजार 658 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यात परीक्षेच्या कालावधीत 21 परीरक्षक यांची नेमणूक करण्यात आली असून 7 ठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र असलेल्या शाळांनी त्यांचा परिसर वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित करावे. तसेच परीक्षा केंद्र परिसरात अशांतता निर्माण करणार्या घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे उपलब्ध करून त्यानुसार परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पार पाडावेत यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश जिल्हा प्रशासन आणि परीक्षा बोर्डाकडून देण्यात आलेले आहेत. त्यानूसार कार्यवाही करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात यंदापासून दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्राची वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. यासाठी सर्व परीक्षा केंद्र वेबकास्टिंग प्रणालीला जोडण्यात आले असून त्याचे नियंत्रण जिल्हास्तरावरून खास पथकामार्फत करण्यात येणार आहे. तसेच मोबाईल अॅपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर होणार्या हालचालीचे रेकॉर्डिंग करून ते जतन करून ठेवण्यात येणार असल्याची कार्यपद्धती अवलंबित येणार आहे.
यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत दरम्यान जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावरील यंत्रणेची सळमिसळ करण्याचा निर्णय बोर्डाच्यावतीने घेण्यात आला होता. मात्र, यासह नगरसह राज्यातील शिक्षक संघटनांनी आणि मुख्याध्यापक संघाने तीव्र विरोध केला. यामुळे अखेर परीक्षा बोर्डाने मागील पाच वर्षात कॉपी केससह गैरप्रकार करणार्या परीक्षा केंद्रावरील शिक्षक आणि शिक्षकेतर यांची बदला बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या कालावधीत काहीना काही प्रकार घडलेला असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यातील केंद्रावरील परीक्षा यंत्रणेचे पर्यवेक्षण करणारी सर्व यंत्रणाची बदलाबदल होणार असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यध्यापक संघटनेची आज बैठक
दहावी आणि बारावीच्या बैठकीत पर्यवेक्षण यंत्रणेच्या अदलाबदल करण्यास मुख्याध्यपक संघटनेचा विरोध आहे. याबाबत रविवारी मुख्याध्यपक संघटनेच्या दापोली याठिकाणी झालेल्या बैठकीत ठराव घेण्यात आला आहे. या विषयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित यांनी दिली.