अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मंगळवारपासून जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली असून पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला 983 विद्यार्थी गैरहजर होते. दरम्यान, यंदा आनंददायी वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात पहिल्यांदा 109 परीक्षा केंद्रांपैकी 1 हजार परीक्षा खोल्यांचे जिल्हा पातळीवर असणार्या वॉर रुममधून वेबकास्टींग करण्यात आले, तर पाच तालुक्यांतील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेर्यातून नजर ठेवण्यात आली. जिल्ह्यात मंगळवारपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून पहिला इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला. परीक्षेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या नेतृत्वाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी 109 केंद्र होते. याठिकाणी इंग्रजीच्या पहिल्या पेपरसाठी 63 हजार 482 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 62 हजार 499 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 983 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे, पोलीस निरीक्षक खेडकर, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, विस्तार अधिकारी सुरेश ढवळे, श्रीराम थोरात, लहू गिरी, जितिन ओहोळ, भावेश परमार यांनी परीक्षा केंद्रावर करडी नजर ठेवली.
यंदा 1 हजार परीक्षा केंद्रांचे जिल्हा पातळीवरून वेबकास्टींग करण्यात आले. जिल्ह्यातील 109 परीक्षा केंद्रांवर सुमारे 1 हजार परीक्षा खोल्यांवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली. यावेळी परीक्षा केंद्रातील हालचालीचे नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रुममधून करण्यात येत होते. परीक्षेच्या कामात कुचराई करणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे.
तत्परता आणि संवेदनशिलता
नगर शहरातील न्यू आर्ट्स कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी आजारी असल्याने तिला भोवळ येऊन ती बेशुद्ध पडली. यावेळी परीक्षा केंद्रावरील परीरक्षक व केंद्र संचालक यांनी तात्काळ तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच शिक्षकांनी संबंधित विद्यार्थिनीचे पालक येईपर्यंत तिच्यावर उपचार करण्याबाबत सूचना देत माणुसकीचे दर्शन घडवले. त्यानंतर तसेच प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचारी भाटे व पोळी यांनी रुग्णालयात जाऊन संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांची भेट घेत तिची विचारपूस केली.
बारावीच्या परीक्षेदरम्यान पाच तालुक्यांतील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले. तसेच काही ठिकाणी परीक्षा केंद्राच्या परिसराचे चित्रीकरण करण्यात आले असून त्याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीच्या ठिकाणी असणार्या परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, याबाबतच्या सूचना वाहतूक शाखेला देण्यात आल्या होत्या.
– सिध्दराम सालीमठ, जिल्हाधिकारी.